बुधवार, २४ ऑगस्ट, २०११


जबाबदार नागरिक बनण्यासाठी...
वर्गात नागरिकशास्त्राचा तास चालू आहे. मुले शिकण्यात रंगून गेली आहेत. शिक्षक उत्साहाने शिकवत आहेत.. असं दृश्य काल्पनिक वाटतं ना? बरोबरच आहे. अभ्यासक्रमांतील काही विषय शिकणे मुलांसाठी अगदीच कंटाळवाणे असते आणि म्हणूनच असे विषय वर्गात शिकवताना शिक्षक म्हणून खरी कसोटी लागते. असाच कसोटी पाहणारा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. यातले सारे धडे मुलांना उपदेशपर वाटतात. त्यातील शासनव्यवस्थाविषयक धडे नीरस वाटतात (म्हणजे ते तसे असतातही!). एक तर यात लोकशाही, राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क इ. अमूर्त संकल्पना भरपूर असतात. त्या समजावून सांगताना भाषणबाजी केली की, मग वर्गात जांभयांचे भरघोस पीक येणारच.

लोकशाही हा विषय शिकवताना निवडणुका का अपरिहार्य आहेत, त्या कशा पद्धतीने होतात अशी चर्चा सुरू झाल्यावर मी पाचवी ते सातवीच्या वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर केल्या. तशा निवडणुका बहुतेक शाळांमध्ये होतातच, पण मी हा विषय नुसता प्रतीकात्मक निवडणुकांपुरता ठेवायचा नाही, असे ठरवून त्याला अभ्यासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.

उमेदवार ठरवणे, सूचक- अनुमोदक, बोधचिन्ह, मतदान, मतमोजणी, अंतिम निकाल या सर्व पाय-यांवर चर्चा झाली. त्यानुसार मुलांनी अर्ज भरले. स्वत:ची चिन्हे ठरवली. कल्पकतेने प्रचार केला. हक्क आणि कर्तव्य यावरील चर्चेच्या वेळी आम्हाला शाळेत कोणते हक्क आहेत व आमची कर्तव्ये काय आहेत, याची मुलांनी एक यादीच केली. त्यातून त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. शिवाय वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी कर्तव्य बजावले नाही तर काय करावे, याचाही विचार करण्यात आला. निवडणुका मजेत पार पडल्या.

याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. त्या दिवाळीच्या सुटीत असल्याने या वर्षी पाचवी ते सातवीच्या मुलांना दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणुका हाच विषय अभ्यासासाठी दिला. त्यासाठी त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार प्रश्नही काढून दिले. ‘पालकांची मदत लागली तर घेऊ शकता, पण स्वत: वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ यांचा वापर करून जाणून घ्या’, असे सांगितले. बरीच मुले सुट्टीत गावी जातात. त्यांना तिथेही हा अभ्यास करता येणे शक्य होते. प्रश्नावलीत ‘ही कितवी विधानसभा निवडणूक आहे, तुझ्या मतदारसंघात कोण उभे होते, त्यांची निशाणी काय होती, त्यांनी प्रचार कसा केला, प्रत्यक्ष निवडणूक कधी झाली, कोण निवडून आले, कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या, सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण, विरोधी पक्ष म्हणजे काय, मुख्यमंत्री कोण झाले, मंत्रिमंडळ केव्हा स्थापन झाले, कुणाला काय खाती मिळाली’ यासारखे प्रश्न होते. मुलं सुट्टीभर सर्व साधनांचा वापर करून उत्साहाने माहिती मिळवत होती. यामध्ये मुद्दामच पालकांचा सहभाग असावा, असे सांगितले होते.

सुट्टीनंतर मुलं शाळेत आली तेव्हा समजले की, सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद नकारात्मक होता. ‘तुला काय कळणार आहे राजकारणातलं? राजकारण म्हणजे घाणेरडा विषय, त्यावर कशाला बोलायचं?’ अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या होत्या, पण मुलांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि पालक मुलांशी बोलायला लागले. मुलांनी प्रसारमाध्यमांचाही मुलांनी चांगला उपयोग केला. सर्व माहिती स्वत:च जमवल्याने त्यांना हा विषय वर्गात न शिकवताही उत्तम समजला.

‘सुट्टीत कशाला हो ताई अभ्यास’, असे म्हणणा-या मुलांनी सर्वात आधी आपला प्रकल्प सादर केला! त्यात त्रुटी एकच होती, ती म्हणजे मंत्रिमंडळ जाहीरच झालेले नसल्याने मुलांचा एक प्रश्न अपुरा होता. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नव्हता. मराठीतून शपथ घेणे, त्या वेळी झालेली मारामारी यावरही वर्गात हिरीरीने चर्चा झाली. हा रूक्ष विषय पाहता-पाहता बोलका झाला.

मुलांनी केवळ निवडणुकीचीच माहितीच मिळविली नाही तर आई-वडिलांना मतदान करण्यास प्रवृत्त केले. सातवीच्या मुलांनी विचारपूर्वक उत्तरे लिहिली, शिवाय स्वत:ची मतेही मांडली. उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, पैसे देऊन मत विकत घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर कमी करावा, अशी मते मुलांची या विषयाबाबतची सजगता दर्शवणारी होती.

या प्रकल्पातून आम्हाला काय मिळाले, याचा विचार केला तर ‘ही मुले लहान आहेत, यांना काय कळते’ हा आमचा आणि पालकांचा भ्रम दूर झाला. मुलं टी.व्ही.वर बातम्या पाहू लागली. वर्तमानपत्रे वाचू लागली. दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्याला असायला हवी, हे त्यांना पटले. सहावीतल्या उमाने तर तिच्या घराजवळील मैदानात खेळताना होणा-या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी त्या भागातील नगरसेवकाकडे तक्रार करून त्यांचा बंदोबस्त केला! हा प्रश्न घरापर्यंतही जाऊ न देता मुला-मुलींनी स्वत: सोडवला. यापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय मुलांना चांगला समजला याची कसोटी कुठली असू शकेल?

पालक ब-याचदा मुलांशी राजकारणाबद्दल चर्चा करत नाहीत. तसं न करता मुलांना राजकारणाबद्दल समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना घेऊन जायला हवं. याबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र वाचन, टी.व्ही.वर बातम्या बघणं या गोष्टींमध्ये मुलांना आवर्जून सहभागी करून घ्यायला हवं. दैनंदिन घडामोडींची माहिती मुलांना द्यायला हवी. त्यांनी पुढाकार घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याच्यातील नेतृत्वगुणांना वाव द्यायला हवा. त्यातूनच सुजाण नागरिकांची निर्मिती होऊ शकेल, केवळ घोकंपट्टी करून नव्हे!


‘आनंद निकेतन’ टीम


बुधवार, १० ऑगस्ट, २०११

रंग पावसाचे

Alka Aserkar Alka Aserkar


नभ उतरू आलेले शिखरांच्या माथ्यावर...आज पुन्हा गीत नवे माझ्याही ओठांवर....कवी हेमंत राजारामच्या या ओळी खूप आवडतात मला पाऊस ....तीन अक्षरी शब्द केवळ......पण तो उच्चारताच किती किती अर्थ ध्वनित होत राहतात त्यांतून.....प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक कोटुंबिक, व्यावसायिक, स्थानिक  पार्श्वभूमी तसंच वय, लिंग परिस्थिती,  ...या सगळ्यांना अनुसरून हे अर्थ प्रतित होत राहतात...मनात घूमत राहतात... ग्रीष्माला वळीवाची आस लागली की मृगाच्या धारांची वाट आपणही चातकासारखी पाहायला लागतो..त्याच्या येण्याच्या तारखा डीक्लेअर्ड होत राहतात....केरळच्या किना-यावर त्याचं पाऊल पडलं की त्याच्या  पुढच्या प्रत्येक मुक्कामाच्या बातम्या व्हायला सुरूवात होते...पण आमचे ज्येष्ठ कवी व.शं. खानवेलकर म्हणतात त्याप्रमाणे पावसाच्या बातम्या या वर्तमानपत्रात कधीच वाचायच्या नसतात. त्या विचारायच्या असतात  झाडांना, पाखरांना...रंग बदलत जाणा-या आभाळाला..थंड होत जाणा-या वा-याच्या झुळुकीला.....मग बळीराजा त्याची गणितं मांडायला सुरूवात करतो...पण वर्गातल्या गणितात कच्च्या असलेल्या मुलासारखीच त्याची स्थिती असते बहुधा .....सुदैवानेच पास झाला तर झाला.....गृहीणी उन्हाळी कामांचा शेवट करत आणतात....शहरवासीय वर्षासहलींचे बेत आखू लागतात.....मुंबईसारख्या महानगरात पावसाआधी गटारांची चर्चा करावी लागते....लोकलची स्थिती तपासावी लागते.....खेडयातल्यांना घरं शाकारावी लागतात....कवींना याच्या स्वागतासाठी शब्दांचा पाऊस तयार ठेवावा लागतो...प्रत्यक्ष पावसात भिजण्याऐवजी शब्दांच्या पावसात भिजण्यावर त्यांचा जास्त भर असतो....सर्वसामान्यांना पाऊस म्हटला की आधी छत्र्यांचे वेध लागतात....होता होईतो जितकं कोरडं राहता येईल तितकं बरं...अशा पंथातले लोक या वर्गात मोडतात....
मग तो येतोच.....बहुधा अनपेक्षितपणेच गाठतो.....तारांबळ उडवतो....मग बरसतो....कधी.रीमझीमतो, कधी कोसळतो, कधी टपटपतो, पाऊस म्हणजे सूर...लय...ताल....जोडीला वा-याची बासरी अन् ढगांचा मृदुंग....बिजलीचं नृत्य अन् झाडांचं घुमणं........पृथ्वीच्या रंगमंचावर हा बहारदार खेळ सुरू होतो.....आणि तो जगन्नियंता अजूनही या पृथ्वीवर, इथल्या प्राणीमात्रांवर आणि विशेषतः मानवजातीवर रूसलेला नाही याची खात्री पटते.....
पाऊस म्हणजे संगीत...पाऊस म्हणजे विरहगीत..पाउस म्हणजे सैगलचं गान अन् लताची सुरीली तान....पाऊस म्हणजे भिजलेली मधुबाला आणि ऱफीचा मधाळ स्वर...पाऊस म्हणजे हिंदी सिनेमा...सावनचे झुले....आणि संदेसे....पाऊस म्हणजे गरमागरम चहा....मक्याचं कणीस....कांदा भजी.....पाऊस म्हणजे कागदाची होडी....प्रियेची खोडी...दोन मनांची जोडी....पाऊस म्हणजे रोमान्स....रेन डान्स...पाऊस म्हणजे दोघात एकच छत्री....झोपडीला ताडपत्री...पाऊस म्हणजे त्याची आठवण...तिचं वाट पहाण्...पाऊस म्हणजे हुरहूर..मनात विनाकारण काहूर...अन् डोळ्यातला पूर....पाऊस म्हणजे मोराची केका...मनमोराच्या हाका..पृथ्वीचं न्हाण....सृजनाला आव्हान...पाऊस म्हणजे थरथर पान, भिजरा माळ अन् हसरं रान.....पाऊस म्हणजे खळखळ ओढा....नदीला अवखळ पूर...सा-या आसमंताचा न्याराच नूर.....पाऊस म्हणजे कालीदासाचा आषाढ....बोरकरांचा श्रावण....पृथ्वीला लागलेला पाचवा महिना....पाऊस म्हणजे मेघशाम....पाऊस म्हणजे यमुना..पाऊस म्हणजे गोवर्धन....पाऊस म्हणजे कृष्णाची वेणू....अन् सप्तरंगी इंद्रधनू...पाऊस म्हणजे
माझा कवी मित्र हेमंत राजाराम म्हणतो.. 'जवळचा तरी मानाचा....पाऊस पाहुणा रानाचा...'
किती किती वर्णन केलं तरी ते अपूरंच वाटावं असा हा पाऊस.....कधी कधी पाऊस म्हणजे पूर भरपूर....जिकडे तिकडे चिखल.....घाण...गोरगरीबांची दाणादाण.....लोकल्स बंद...प्रवास ठप्प.....अवकाळी पिकांचं मरण....अन् शेतक-याचं सरण....पण यातील बहुतांश गोष्टींना आपणच कारण...... एक शायर म्हणतो की...मिजाज बारीशका हमसे पुछो.....हम जो कच्चे मकानके वासी है......खरंच या पावसाची रूपं किती...तर या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव निर्जीव प्राणीमात्रांच्या संख्येएवढी.....प्रत्येकाच्या तनामनातला पाऊस वेगळा.....
-अलका.

गावाकडचा पाऊस


Alka Aserkar
पाऊस....शब्द एकच...पण प्रत्येक ठिकाणची त्याची रुपं वेगवेगळी....शहरातला पाऊस, खेड्यावरचा पाऊस, रानातला पाऊस, शेतातला पाऊस....सगळीकडं त्याचे संदर्भही वेगवेगळेच........त्याचं स्वागतही वेगवेगळ्या पद्धतीने....रानात झाडाझाडांच्या पायात जणू पैंजण बांधून त्यांना तो आपल्या तालावर नाचवत असतो...सोबतीला वा-याची वेणू...मेघमल्हाराची तान....पण तोच शहरात कोसळताना मात्र बापुडवाणाच होतो...इथं त्याच्या तालावर बेभान होऊन तसं कोणी नाचत नाही...मग तो वेगळ्या पद्धतीने नाचवतो...लोकल्स बंद पाडून...नाल्यांमध्ये पूर आणून...लोकांच्या तोंडाला फेस आणण्याचे काम करतो...शेतावर बरसताना कर्तव्याचे भान ठेवण्याचा प्रयत्न तो आपल्यापरीने करतो...डोंगरांवरून धबाधबा कोसळतो आणि तरूणाईचं भान हरपवतो.....संथ, सूस्त झालेल्या नद्यांना पळवण्याचं काम करतो....ठराविक मोजूनमापून उसळणा-या सागरातील लाटांना जरा चेतवतो......
आज मला आठवतोय तो लहानपणीचा माझ्या गावाकडचा पाऊस....साई..माझं जन्मगाव...कोकणातलं ते खेडं...पावसाळ्यात पाऊस भरपूर..जून महिन्यात एकदा पाऊस बसला की चार महिने निघायचं नांव घेत नसे. नंतर आता जातो मग जातो करत करत दसरा-नवरात्र करूनच जायचा तो...तालुक्याला जोडणारा रस्ता कच्चा...एक पाऊस पडला की एस.टी.बंद..लोकांचं उठसूट तालूक्याच्या गावी जाणं बंद व्हायचं म्हणून मग घरात लागणारं सामान आगोठीच्या आतच भरलं जाई....गावात सातवीपर्यंतची चार खोल्यांची शाळा...जमीन शेणाने सारवणीची तिला ओल येई...मग चार महिने रोज घरून बसण्यासाठी गोणपाट घेऊन जावं लागे....
शाळेच्या खिडकीतून लांबचलांब, पाsर त्या टोकापर्यंत, डोंगराच्या कडापर्यंत पसरलेली शेती दिसत असे. हिरव्यागार शेतांचे लहानमोठे चौकोन..त्यावरील बांधांच्या लालसर रेघा !..अधूनमधून झाडं...झाडांनी गच्च भरलेले डोंगर..आणि या सर्वांवरून भरपूर कोसळत असलेला धुवाँधार पाऊस ! त्या धुवाँधार पावसाच्या वर्षावात जोराचं वारं वाहायला लागलं की सगळ्या वातावरणाला एक वेगळाच निळसर रंग येई..त्या रंगात डोंगर, झाडं सर्व धूसर धूसर दिसत. ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर अजून जसंच्या तसं येतंय....
बाहेर रपारपा पडणारा पाऊस आणि घरात पाटावर वालाचं बिरडं सोलत बसलेली माझी आजी हे पावसाळ्यातलं आमच्या घरातलं नेहमीचं दृश्य. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत तेव्हा..मग वाल, बेगमी करून ठेवलेले भोपळे, सूरण, रताळ्यांचे कंद यांवरच चार महिने भागवायला लागायचं...पावसाळ्यात मिळणारी एकच भाजी ती म्हणजे कंटोली....ती सर्वांना प्रिय...
आवटातील बहुसंख्या लाकडं ओलसर होत मग पाणी तापवण्यासाठी चूल पेटवताना फार त्रास होई. फुंकणीने फुंकून फुंकून तोंड दुखून जाई अगदी.....
डोक्यावर इरलं किंवा घोंगडं घेऊन शेतकरी, कुणबी ढोपरभर चिखलातून कामं करताना सर्वत्र दिसत..दिवसभर चिखलातून काम केल्यानं त्यांच्या पायाला चिखल्या होत..मग संध्याकाळी घरी आल्यावर शेकोटी पेटवायची त्यात मेंदीचा पाला टाकायचा आणि  त्याच्या धूरावर पाय धऱून बसायचं...शेकोटीच्या वरती भिंतीवर ओलं घोंगडं सुकण्याकरिता पसरून टांगलेलं असे.
श्रावणाचे दिवस आले की पाऊस जरा विश्रांती घेई...बालकवींच्या कवितेतील वातावरण सर्वत्र चित्ररूप होऊन येई. दोन महिने घराबाहेर विशेष पडायला न मिळालेल्या बायका मग श्रावणी सोमवारी शंकराला जायच्या निमित्ताने निघत...शंकराचं मंदिर पार कोंडाच्याही वरती...शेतांच्या बांधा बांधावरून जावं लागे....मध्ये छोटासा ओहळ लागे...त्या पाण्यातून पुढं गेलं की एक अगदी एवढीशी टेकडी होती त्यावर शंकराचं मंदीर आणि मंदिरालगत स्मशान..! आजूबाजूच्या हिरव्यागार पट्ट्याने आनंदीत आणि उल्हसित झालेलं मन टेकडी चढताच धसकायचं. सगळी भीती एकदम दाटून यायची. स्मशानातच ते मंदीर होतं.

मंदीरातून आल्यावर मग दोन रात्री झोप लवकर लागायची नाही. भीती वाटत राहायची. त्यात परसातल्या केळींच्या पानावर पडणारे पावसाचे टपटप पाणी. रातकीड्यांचा कीर्र आवाज आणि बेडकांचे डराँव डराँव अव्याहत चालू असे.- हे सर्व आवाज भीतीत भर घालत.
मग येई दहीहंडी . गोपाळकालो खेळणारा गोविंदा मग घराघरातल्या गृहीणींना तुझ्या घरात नाही गं पाणी म्हणून चिडवत येई...त्यांच्या अंगावर बादल्या भरभरून दहीताकमिश्रीत पाणी ओतावं लागे....यानंतर सुरू होत गणपतीच्या स्वागताकरिता नाच..गावातील मारूतीमंदीरासमोर हे नाच होत...पावसामुळे चिखल झालेल्या जमिनीवर नाचणा-यांकरिता भाताचा कोंडा पसरून घातला जाई...घराघरांच्या पाय-यांवर, ओटीवर बसून लोक तासनतास नाच पाहात बसत....गणपतींना निरोप देण्यासाठी मात्र पाऊस हमखास हजेरी लावीच. गावाबाहेरच्या नदीत होणा-या विसर्जनाला हिरवं-ओलं, मऊ गवत तुडवत गेलो नाही, असं कधी झालं नाही.
आताही 'नेमेचि येतो मग पावसाळा' प्रमाणे पाऊस येतोच. पण आता 'तो' पाऊस नाही. इथं शहरात त्याची रुपं बदललीयत. माझ्यासाठी तरी. धुवाँधार पावसात हिरवीगार शेतं नाहीत बघण्यासाठी तर खिडकीतून दिसते ती समोरची पिवळी आणि शेवाळलेली इमारत..!
-अलका.
Alka Aserkaraserkaralka@yahoo.com

येथे थुंकून ये !!


अभिजीत आपटे


कॅब मधून ऑफ़िसला जाताना मी कित्येकदा लोकांच्या संभाषणात "चूर्ण आहे का?" "गोळी दे बर!" अशी वाक्ये एकायचो, पहिल्यांदा याचा "अर्थ" माझ्या ध्यानी नाही आला पण नंतर लक्शात आले की "गोळी, चूर्ण" ही "तंबाखु, मावा किंवा गुट्खा" यांची नविन नावे आहेत..  गंमत वाट्ली की "जी नावे आपण शरीराचा आजार बरा करण्यासाठी वापरतो तीच आज शरीराला असाध्य व्याधी देणार्या या "पुडी" ला वापरली जात आहेत." यामध्ये या लोकांचा काहीच दोष नाही म्हणा कारण या "पुडयांच्या" कंपन्यांनी लोकांना याची आधी सवय लावली आणि मग वापरणार्यांना "कर्करोग" झालाच तर त्यांच्या उपचारासाठी मोठी हॊस्पिट्ल्सही काढून दिली आहेत..

"रस्त्यावरुन एखादा चालणारा माणूस असो अथवा चारचाकीतला प्रवासी असो तो रस्त्यांवर वा भिंतींवर थुंकून पुढे निघून जातो.

कित्येकदा भिंतींवर "येथे थुंकू नये" असे लिहिले जरी असले तरी मग याचा अर्थ "येथे थुंकून ये" असा घेऊन हे सारे "रंगारी" तिकडे "पिचकारी" उडवून बेफ़ामपणे निघून जातात.

वाचकहो याचा अपाय या रंगा-यांबरोबर आपल्यावर पण होतोच की संसर्गजन्य रोगांमुळे. मी तर असेही ऐकले होते की या रंगा-यांवर सरकारने दंडही ठेवला आहे.. अफ़वा असावी ही कदाचित..
फोटो गॅलरी


गुरूबिन कौन बतावे वाट , बडा बिकट यमघात !

                            
                                                       
संत कबीरांनी गुरूंचे महत्व सांगताना या ओळी लिहिल्या ,माणूस जन्माला आल्यावर १ ला गुरु त्याची आई मग वडील , शाळेत शिक्षक ,नंतर महाविद्यालयातले
शिक्षक म्हणजेच कोणतेही ज्ञान शिकवणारा प्रत्येक हा आपला गुरु आहे."गुरु"या शब्दाचा अर्थच मुळी असा आहे , कि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा स्वयन्प्रकाश  आहे
जीवनात आपले दीक्षागुरु, मोक्षगुरू .मंत्रागुरू,योगगुरू असे निरनिराळे गुरु असू शकतात.आपल्या भारतीय अध्यात्मिक इतिहासात नाव घेण्यासारख्या काही जोड्या झाल्या
.निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर ,समर्थ रामदास-कल्याणस्वामी , रामाक्रीष्ण ,  स्वामी विवेकानंद, इत
       आपण सर्वसामान्य माणसे  या महान व्यक्तींचा नुसता आदर्श जरी डोळ्यासमोर ठेवून वागलो तरी आपल्या आयुष्यात बदल होईल. आपण खरेच प्रामाणिक प्रयत्न
केले आणि सद्गुरुप्राप्तीची तळमळ असेल ,ओढ असेल तर सद्गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, हे नक्कीच !या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा  असेही म्हणतात.या दिवशी व्यासांची पूजा करतात
आपल्या गुरुन्बाद्धालची  निष्ठा सतत जागरूक ठेवण्याच्गुरुंचे स्मरण करण्याच,आणि आपले जीवन सुधारण्याचा हा मंगलदिन आहे.जमत असेल तर या दिवशी रुद्राभिषेक करावा
.व गुरुणा वस्त्र, दक्षिणा द्यावी व्यासांच्या पूजेसाठी पूर्वी आद्यगुरु श्रीक्रीष्णा, व व्यास यांची षोडशोपचारे पूजा करत. पण हल्ली फारशी हि पूजा कोणी करत नाही,त्याऐवजी
आपल्या जीवनास वळण लावणाऱ्या व्यक्तींच्या नवे सुपार्या मांडून त्यांचे पूजन करणे जास्त योग्य ठरते.मोक्ष गुरु जरी एकच असला तरी साध्नागुरू,दीक्षागुरु,संथागुरू ,
प्रपंच गुरु .अनेक असतात.
        काही वेळा आपल्या विरोधात असणारे हि आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपला द्वेष करणारे ,आपला शारीरिक व मानसिक छळ करणारेही आपल्याला या जीवनाची दुखद
अवस्था सांगून जातात. ते सुद्धा आपले गुरूच असतात. हि विशाल दृष्टी म्हणजेच खर्या अर्थाने व्यास(विशाल) पूजा आहे.आणि ती दृष्टी  मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यासपूजा होणे आवश्यक वाटते.
शक्य झाल्यास आपल्या गुरुणा भेटून नमस्कार करावा,त्यांना भेटवस्तू द्यावी. पण व्यावहारिक दृष्ट्या त्यात अडचण असेल तर त्यांचे मनात स्मरण करावे .
        अशा रीतीने आपल्या आयुष्याला वळण लावणाऱ्या गुरुंना आठवण करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्याच आहे,
                                                   गुरुर्ब्र्हाम्ह : गुरुर्विष्णु  गुरुर्देवो महेश्वर :
                                                   गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवा नमः :
        असे म्हणून आपण आपल्या गुरुंपुढे नतमस्तक होऊया.



madhvi dani 



danimadhvi@gmail.com



भोजनातील हानिकारक संयोग


दुधा सोबत

दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत

खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

तुपा सोबत

थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

मधा सोबत

मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर

पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत

गुळ खाणे नुकसान दायक असते.

खीरी सोबत

खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर

मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर

शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर

पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत

काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत

दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांसा बरोबर

मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर

थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर

लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दहि नुकसान कारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.



लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय


तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स



आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.

१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.

५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.

८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.

१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.

१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.

१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.



सौंदर्य




सकाळी सूर्योदय व्हायच्या जवळपासची वेळ हवेत असलेला गारवा आणि त्याचबरोबर असलेली निरामय शांतता ; खूप हवीहवीशी वाटणारी , अन त्याचवेळी अंतरंगात दाटलेली , काहीतरी नवीन सुचते.
थोडक्यात काय तर अशावेळेस अंतरंगातल्या तारा झंकारल्या जातात आणि एक प्रकारचे सुमधुर संगीताचे स्वरच   शब्दांच्या रूपाने बाहेर पडतात. सकाळची वेळच मुळी सृजनाची असते.
अंधारलेल्या रात्री नभांगणात ( अथांग आकाशात ) पसरलेला तार्यांचा मिणमिणता प्रकाशाचा सोहळा बघून काय वाटते याची मजा शब्दात सांगून काय समजणार ! तो डोळे दिपवणारा सोहळा बघतांना निद्रादेवी आपल्या डोळ्यांवर कशी काय हलकेच येऊन बसते हे कळतच नाही.
अमावास्येच्या काळ्याभोर रात्रीच सौंदर्य आणि पौर्णिमेच्या पूर्ण  फुललेल्या  चंद्राच्या रात्रीच सौंदर्य तर शब्दात वर्णन करता येण कठीणच !

तसं म्हटलं तर प्रत्येक रात्री अन दिवसांत सुद्धा एक प्रकारचं अनभिषक्त सौंदर्य व्यापलेलं असतं ;  फक्त ते अनुभवण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे  म्हणजे  आपल्यासाठी समोर आलेला प्रत्येक क्षण
( किमान आपल्यासाठी तरी ) अविस्मरणीय असेल ,  आणि अशा अविस्मरणीय क्षणांमुळे आपलं आयुष्य नक्कीच आपल्या कळत - नकळत खूप  सुंदर , सुखी , समाधानी  आणि सुरेल होऊन जाईल.

लेखक : गौरव श्रीकांत  वेरुळकर.
घरचा पत्ता : मानस ३२/अ , विशाखा कॉलनी , राजीव नगर , नाशिक - ४२२००९ .
भ्रमणध्वनी क्रमांक ( स्वतः कडे असलेला ) : ९०११६३५०५८.

“गुरुपोर्णिमा”.



 आषाढी पोर्णिमा
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे मने हिरवी असताना जी आषाढाची पोर्णिमा येते ती असते गुरुपोर्णिमा. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे.महर्षी व्यास हे आद्य गुरु मानले जातात.महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हि शक्ती गुरुपोर्निमेच्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गृपोर्निमेच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे... सद् गुरुसारखा असता पाठीराखा....!इतरांचा लेखा कोण करी...!!
काही नाती रक्ताची असतात. पण काही रक्तापेक्षाही  घटट असतात. त्यातलं एक मैत्रीच, दुसर गुरु-शिष्याच. आयुष्यात मित्र असेल तर सोन्याला सुगंध जणू... पण मित्र आयुष्याला अर्थ देईलच असे नाही. ते काम गुरुच. गुरु नेमक करतो तरी काय? तर गुरु दृष्टांत देतो. उत्कर्षाची वाट दाखवतो. आयुष्याला अर्थ देतो. संगीताच्या घराण्यात भास्कर बुवा वखले, भीमसेन जोशी यांनी गुरुकडे पडतील ती कामे केली. मुस्लीम गुरुकडे हिंदू शिष्य गुरुकुल पद्धतीने वाढले. शिष्योत्ताम्माना योग्य पातळीवर येण्यापूर्वी जे कराव लागल त्याला रेगिंग म्हणून कसं चालेल? तोच तर जीवनानुभव असतो आणि तो गुरु कडे मिळतो. कुठलीच विद्या स्वस्तात मिळत नाही. त्याच परंपरेत एकलव्य सारख्या धनुर्धाराला आपला अंगठा द्यावा लागला, तर विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला आपल्या गुरूच्या रक्षणासाठी युद्ध करावे लागले.
गुरुपोर्णिमा हा कोणता सण नाही जो साजरा करण्यासाठी गुरूला हार, फुले, फळ, पैसे किवा कपडे दिले जातात. तर ह्या पवित्र दिवशी खऱ्या मनाने गुरूला साम, दाम, दीक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मनःशांती, खरेपणा, उदारपणा, पवित्रपणा, चारित्र्य, चांगले वागणे आणि आत्मसमर्पण ह्यासारखी १५ प्रकारची फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. गुरूला आपल्या संस्कृती मध्ये देवाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आद्य शक्तीची ह्या दिवशी पूजा होते ते महर्षी व्यास म्हणजे महाभारताचे कवी, ज्यांनी खुद्द विद्यापती गणेशालाच लेखनिक बनवलं. व्यासोचछीष्टमं जगत सर्वं !असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्य शक्तीला माझा कोटी-कोटी प्रणाम !!!!!
GURU is Shiva without his three eyes!
Vishnu without his four arms! Brahma without his four head!
He is Param-Shiva himself in Human Form!!!

Sheetal Pote sheetalpote4475@gmail.com
Sheetal Pote