बुधवार, २४ ऑगस्ट, २०११


जबाबदार नागरिक बनण्यासाठी...
वर्गात नागरिकशास्त्राचा तास चालू आहे. मुले शिकण्यात रंगून गेली आहेत. शिक्षक उत्साहाने शिकवत आहेत.. असं दृश्य काल्पनिक वाटतं ना? बरोबरच आहे. अभ्यासक्रमांतील काही विषय शिकणे मुलांसाठी अगदीच कंटाळवाणे असते आणि म्हणूनच असे विषय वर्गात शिकवताना शिक्षक म्हणून खरी कसोटी लागते. असाच कसोटी पाहणारा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. यातले सारे धडे मुलांना उपदेशपर वाटतात. त्यातील शासनव्यवस्थाविषयक धडे नीरस वाटतात (म्हणजे ते तसे असतातही!). एक तर यात लोकशाही, राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क इ. अमूर्त संकल्पना भरपूर असतात. त्या समजावून सांगताना भाषणबाजी केली की, मग वर्गात जांभयांचे भरघोस पीक येणारच.

लोकशाही हा विषय शिकवताना निवडणुका का अपरिहार्य आहेत, त्या कशा पद्धतीने होतात अशी चर्चा सुरू झाल्यावर मी पाचवी ते सातवीच्या वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर केल्या. तशा निवडणुका बहुतेक शाळांमध्ये होतातच, पण मी हा विषय नुसता प्रतीकात्मक निवडणुकांपुरता ठेवायचा नाही, असे ठरवून त्याला अभ्यासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.

उमेदवार ठरवणे, सूचक- अनुमोदक, बोधचिन्ह, मतदान, मतमोजणी, अंतिम निकाल या सर्व पाय-यांवर चर्चा झाली. त्यानुसार मुलांनी अर्ज भरले. स्वत:ची चिन्हे ठरवली. कल्पकतेने प्रचार केला. हक्क आणि कर्तव्य यावरील चर्चेच्या वेळी आम्हाला शाळेत कोणते हक्क आहेत व आमची कर्तव्ये काय आहेत, याची मुलांनी एक यादीच केली. त्यातून त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. शिवाय वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी कर्तव्य बजावले नाही तर काय करावे, याचाही विचार करण्यात आला. निवडणुका मजेत पार पडल्या.

याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. त्या दिवाळीच्या सुटीत असल्याने या वर्षी पाचवी ते सातवीच्या मुलांना दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणुका हाच विषय अभ्यासासाठी दिला. त्यासाठी त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार प्रश्नही काढून दिले. ‘पालकांची मदत लागली तर घेऊ शकता, पण स्वत: वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ यांचा वापर करून जाणून घ्या’, असे सांगितले. बरीच मुले सुट्टीत गावी जातात. त्यांना तिथेही हा अभ्यास करता येणे शक्य होते. प्रश्नावलीत ‘ही कितवी विधानसभा निवडणूक आहे, तुझ्या मतदारसंघात कोण उभे होते, त्यांची निशाणी काय होती, त्यांनी प्रचार कसा केला, प्रत्यक्ष निवडणूक कधी झाली, कोण निवडून आले, कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या, सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण, विरोधी पक्ष म्हणजे काय, मुख्यमंत्री कोण झाले, मंत्रिमंडळ केव्हा स्थापन झाले, कुणाला काय खाती मिळाली’ यासारखे प्रश्न होते. मुलं सुट्टीभर सर्व साधनांचा वापर करून उत्साहाने माहिती मिळवत होती. यामध्ये मुद्दामच पालकांचा सहभाग असावा, असे सांगितले होते.

सुट्टीनंतर मुलं शाळेत आली तेव्हा समजले की, सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद नकारात्मक होता. ‘तुला काय कळणार आहे राजकारणातलं? राजकारण म्हणजे घाणेरडा विषय, त्यावर कशाला बोलायचं?’ अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या होत्या, पण मुलांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि पालक मुलांशी बोलायला लागले. मुलांनी प्रसारमाध्यमांचाही मुलांनी चांगला उपयोग केला. सर्व माहिती स्वत:च जमवल्याने त्यांना हा विषय वर्गात न शिकवताही उत्तम समजला.

‘सुट्टीत कशाला हो ताई अभ्यास’, असे म्हणणा-या मुलांनी सर्वात आधी आपला प्रकल्प सादर केला! त्यात त्रुटी एकच होती, ती म्हणजे मंत्रिमंडळ जाहीरच झालेले नसल्याने मुलांचा एक प्रश्न अपुरा होता. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नव्हता. मराठीतून शपथ घेणे, त्या वेळी झालेली मारामारी यावरही वर्गात हिरीरीने चर्चा झाली. हा रूक्ष विषय पाहता-पाहता बोलका झाला.

मुलांनी केवळ निवडणुकीचीच माहितीच मिळविली नाही तर आई-वडिलांना मतदान करण्यास प्रवृत्त केले. सातवीच्या मुलांनी विचारपूर्वक उत्तरे लिहिली, शिवाय स्वत:ची मतेही मांडली. उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, पैसे देऊन मत विकत घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर कमी करावा, अशी मते मुलांची या विषयाबाबतची सजगता दर्शवणारी होती.

या प्रकल्पातून आम्हाला काय मिळाले, याचा विचार केला तर ‘ही मुले लहान आहेत, यांना काय कळते’ हा आमचा आणि पालकांचा भ्रम दूर झाला. मुलं टी.व्ही.वर बातम्या पाहू लागली. वर्तमानपत्रे वाचू लागली. दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्याला असायला हवी, हे त्यांना पटले. सहावीतल्या उमाने तर तिच्या घराजवळील मैदानात खेळताना होणा-या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी त्या भागातील नगरसेवकाकडे तक्रार करून त्यांचा बंदोबस्त केला! हा प्रश्न घरापर्यंतही जाऊ न देता मुला-मुलींनी स्वत: सोडवला. यापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय मुलांना चांगला समजला याची कसोटी कुठली असू शकेल?

पालक ब-याचदा मुलांशी राजकारणाबद्दल चर्चा करत नाहीत. तसं न करता मुलांना राजकारणाबद्दल समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना घेऊन जायला हवं. याबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र वाचन, टी.व्ही.वर बातम्या बघणं या गोष्टींमध्ये मुलांना आवर्जून सहभागी करून घ्यायला हवं. दैनंदिन घडामोडींची माहिती मुलांना द्यायला हवी. त्यांनी पुढाकार घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याच्यातील नेतृत्वगुणांना वाव द्यायला हवा. त्यातूनच सुजाण नागरिकांची निर्मिती होऊ शकेल, केवळ घोकंपट्टी करून नव्हे!


‘आनंद निकेतन’ टीम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा