बुधवार, १० ऑगस्ट, २०११

बायकांनी घराबाहेर व पुरुषांनी घरात बसून घरकाम करावे, यात कसली आली आहे स्त्री-पुरुष समानता?




काही वर्षांपूर्वी कुठल्याश्या एका साप्ताहिकात एक पत्र आलं होतं.  त्या साप्ताहिकाचं व पत्र-लेखकाचं नाव आज मला आठवत नाहीये.  त्या पत्रात, पत्र-लेखकाने एक प्रश्न विचारला होता तो मात्र ठळकपणे आठवतोय. तो प्रश्न असा होता की, जर एखादा सुस्थापित मुलगा एखाद्या नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलीशी लग्न करू शकतो, तर एका सुस्थापित मुलीने एखाद्या सुशिक्षित, पण नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न करायला काय हरकत आहे?

काय, गडबडलात ना?  काही क्षण मी सुद्धा सर्द झालो.  बरोबर आहे!  कारण प्रवाहाच्या विरुध्द जाण्याचा आपण कधी विचारच करत नाही.  परंपरेची बंधनं सहजासहजी झुगारून देणं आपल्या संस्कृतीत बसत नाही.  थोडा विचार केल्यावर त्या  प्रश्नातला फोलपणा मला जाणवला.  वास्तविक, एखादा सुशिक्षित मुलगा नोकरी-व्यवसाय न करता तसाच बसून राहील हे माझ्यातरी आकलनापलीकडचं आहे. अर्थार्जनासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग तो नक्कीच करेल.  तेव्हा सध्याच्या युगात हा बदल अशक्य  आहे.  
का? 
  त्यासाठी थोडं भूतकाळात जाऊ या....
 
पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.  चूल आणि मुल या परिघाबाहेर ती कधी गेलीच नाही.  त्यामुळे पुरुष अर्थार्जनासाठी घराबाहेर  पडत असे.  स्त्रिया घरातली जबाबदारी पार पाडत असे.  घरातला कर्ता-करविता पुरूषच असायचा.  त्यामुळे घरातले जवळजवळ सर्व निर्णय परस्पर तोच घ्यायचा.  त्यात बायकोचा हस्तक्षेप नसायचा.  बायकोनी काही सुचवलं तर "तुला काय त्यातलं कळतंय" असं म्हणून तिला डावललं जायचं आणि त्यातूनच पुरुष-प्रधान संस्कृती जन्माला आली.  पुरुष स्त्रियांपेक्षा शरीराने सशक्त असल्यामुळे त्याने कमवायचं व आपल्या बायको मुलांचं पालनपोषण करायचं असा एक समज रूढ झाला.  त्यामुळे पुरुष 'पुरुषी अहंकार' जपू लागले.  आणि मग ती आपली परंपराच झाली.  या परंपरेचा पगडा इतका जबरदस्त होता, की आजही काही पुरुष, पुरुष-प्रधान संस्कृती जपताना दिसतात.  मी पुरुष-प्रधान संस्कृतीचं समर्थन करतोय अशातला भाग नाही; पण वास्तव नजरेआड करून देखील चालत नाही.  आणि म्हणूनच असेल कदाचित, की नोकरी करणारी स्त्री आजही उठून चहापाणी, घरातील इतर कामं , सासूला स्वयपाकात मदत इत्यादी कामं करते.  तसे संस्कार तिच्यावर तिच्या आई-वडिलांकडून झालेले असतात! 
 
पण आज परिस्थिती बदलली आहे.  आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेतात. शिक्षण क्षेत्रात स्त्रिया आज पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये.  उद्योग,  समाजकारण, अर्थकारण, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात स्त्री  पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीपणे वावरताना दिसते.  आज घरातल्या महत्वाच्या निर्णयात स्त्रियांचा विचार, त्यांची मतं ग्राह्य मानली  जातायत. स्त्रीच्या जीवनात आता एवढी क्रांती झाली आहे की, स्त्री ही फक्त व्यक्ती न राहता शक्ती झाली आहे व ती केवळ संसाराची शिल्पकार न राहता राष्ट्राची शिल्पकार झाली आहे.
 
सध्या महागाईने इतका कळस गाठलाय की, नवरयाच्या  एकट्याच्या  पगारात संसाराचा गाडा  चालविणे महाकर्मकठीण होऊन बसलंय.  म्हणूनच  आज नवरा-बायको दोघेही अर्थार्जनासाठी घराबाहेर असतात.  काही काही कुटुंबाला तर दोघांचा पगार देखील अपूरा  पडू लागलाय.  म्हणून काही पुरुष  पार्ट-टाईम किवा एखादा जोडधंदा करताना दिसतात.  तेव्हा, आज नवरा-बायको दोघांनी नोकरी करणं अपरिहार्य झालय.  घरात रिकामं बसणं परवडणारं  नाहीये. 
 
पत्र-लेखकाने विचारलेला प्रश्न खुद्द स्त्री-वर्गाला मान्य असेल असं  वाटत नाही.  कारण प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलगी सासरी सुखात नांदावी असे वाटत असते.  मुलगी सुद्धा आपल्या भावी जोडीदाराची, सुखी-संपन्न संसाराची स्वप्नं रंगवत असते. आपला नवरा राजबिंडा नसला, तरी कर्तबगार व स्वाभिमानी असावा, असं  प्रत्येक मुलीला वाटत असतं.  लग्न करण्यापूर्वी आई-वडील प्रामुख्याने मुलाच्या नोकरीची  चौकशी करतात.  हेतू हा, की तो त्याच्या बायको-मुलांचे व्यवस्थित पालनपोषण करू शकेल का?  मग इतर माहिती गोळा करतात.  आज शिक्षणामुळे मुली देखील विचारी बनल्या आहेत.  आपल्या शिक्षणाच्या बरोबरीने तोलामोलाचा नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य आज मुलीना शिक्षणामुळे मिळालंय.  आई-वडिलांनी निवडलेल्या मुलाच्या गळ्यात निमुटपणे माळ घालण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत.  तोलामोलाचा नवरा न  मिळाल्याने लग्नाचं वय निघून गेलेल्या अविवाहित मुली आजही पाहायला मिळतात. त्यामुळे कोणतेही आई-वडिल आपल्या मुलीला जाणून-बुजून नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाच्या गळ्यात बांधणार नाहीत.  नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाशी लग्न केलेली सुस्थापित मुलगी अजून मला  भेटायचिए. 
 
मी आमच्या ऑफिसमधल्या काही मुला-मुलींची या बाबतीतली मतं आजमावली.  काही मुलींचं म्हणणं होतं, की हा बदल निव्वळ अशक्य.  एकीने तर 'आपल्या परंपरेचं ओझं सहजासहजी खाली ठेवण शक्य नाही' असं सांगितलं.  काही मुलीनी 'सध्या शक्य नाही, पण भविष्यात अशक्यदेखील नाही' असं सांगितलं.  माझा रोख सद्य परिस्थितीवर आहे.  भविष्यात काय दडलय हे कोणीच सांगू शकत नाही.  भविष्यात काहीही शक्य आहे.  भविष्याबद्दल इतक्या ठामपणे सांगायला माझंतरी धाडस होत नाही.  एका मुलीला "तू नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलाशी आज लग्न केलं असतं का?"  असं विचारलं असता "आज नसतं केलं" असं ती  प्रांजळपाने म्हणाली.  काही मुलांनी तर, हा बदल पुरुष जातीला आळशी, कुचकामी बनवणारा आहे असं सांगितलं.   एक जण  म्हणाला की, "जर मुलगी सुस्थापित असेल  आणि तिला जर नोकरी-व्यवसाय नसलेल्या सुशिक्षित मुलाची दया आली व तो तिला आवडला,  तर ती त्याच्या बरोबर लग्न करेल देखील.  फार तर ती त्याला सांगेल की, तू घर सांभाळ, मी नोकरी सांभाळते."  इथे पुन्हा जर-तर च्या  गोष्टी!  मी त्याला म्हणालो की, जर तिला २०-२५ हजार रुपये पगार असेल, तर मग ती घरकाम करायला एखादा नोकरच ठेवेल की!   आणित्यातूनही तिने जर  लग्न केले , तर मला वाटतं की ती त्याला आळशी, निरुद्योगी   बनवतेय.  यावर  माझा  मित्र लगेच म्हणाला, "मग  सुविद्य;  पण  नोकरी-व्यवसाय नसलेली बायको आळशी, निरुद्योगी  समजायची काय?"  मी त्याला म्हणालो,  "जर ती सुविद्य, सुशिक्षित असेल आणि नोकरी न करताच बायको म्हणून ती मिरवत असेल, तर नक्कीच ती तिचं टयालेंट फुकट घालवतेय."  बरं, नोकरी-व्यवसाय नसलेल्या, घर सांभाळणाऱ्या  नवरयाला  वाईट नाद लागण्याचादेखील संभव  आहे.  त्यापेक्षा तिने त्याला स्वतःच्या पायावर  उभं राहायला शिकवावं.  त्यासाठी त्याला अर्थ सहाय्य करावं.  त्याच्यातला स्वाभिमान जागा करावा.  असं जर तिने केलं, तर तिच्या सुशिक्षितपणाला अर्थ आहे असं मी समजेन.  सर्वच मुली नोकरी-व्यवसाय नसलेल्या मुलांशी लग्न करू लागल्या, तर मग  स्त्रीमुक्तीवाल्यानी  कुणाच्या तोंडाकडे पाहायचं?  कदाचित मग स्त्री-प्रधान संस्कृती जन्माला येईल   आणि  पुरुष मुक्तीसाठी पुरुषांना एखादी संघटना काढावी लागेल.  हे चक्र मग असेच चालू राहील.  मग माझा  एक चिकित्सक मित्र मला म्हणाला, "पूर्वी बायका बॉबकट, स्लीवलेस ब्लाउज किवा मिनी स्कर्ट घालत नसायच्या.  पण आज सर्रासपणे हे सर्व चालतंय ना? (खरं तर आज पूर्ण कपडे घालणं निषिद्द  मानलं जातंय)  तेव्हा आज आपण हा बदल स्वीकारलाय ना?  मग  पत्र- लेखकाने सुचवलेला बदल का स्वीकारला जाऊ नये?" मला वाटतं  की, बॉबकट, स्लीवलेस ब्लाउज किवा तोकडे कपडे हा फशनचा  भाग झाला.  हे  पाश्चात्त्य  देशाचं अनुकरण झालं.  उलट, आपल्या   बायकोने कसं दिसावं हे आजकाल  पुरूषच ठरवतात असं मी ऐकून आहे.  तेव्हां हा बदल स्वीकारार्ह आहे.  कारण त्यामुळे पुरुषी इगो दुखावला जात नाही.  पण बायको कमावणार व नवरा घरकाम करणार यात कुठेतरी पुरुषी इगो दुखावला जातो.  पत्र-लेखकाने सुचवलेला बदल जर अमलात आणायचा असेल, तर पुरुषांना आपली मानसिक जडण-घडण बदलावी लागेल.
 
खरंतर, पत्र-लेखकाने उपरोक्त बदल सुचवून एकाला उद्योगी तर दुसर्याला  निरुद्योगी बनवण्याचा घाट घातला आहे असं मला वाटतं.  ते एकाला महत्व देत आहेत ,  तर दुसरयाला दुय्यम ठरवताहेत.  बायकांनी घराबाहेर व पुरुषांनी घरात बसून घरकाम करावे, यात कसली आली आहे स्त्री-पुरुष समानता?  
 
पण पत्र-लेखकाला हे स्त्री-पुरुष समानतेच्या वाटेवरील पुढचं पाऊल वाटतंय असं त्यांनीच आपल्या पत्रात पुढे म्हटल्याचं आठवतंय.  मला वाटते की, उलट चार पावलं आपण मागे जात आहोत.  इथे पत्र-लेखक पूर्व-परंपरा कायम ठेवतायत.  फक्त प्यादी बदलताहेत. 
 
आपल्याकडे मुला-मुलींना वाढवताना जो भेद केला जातो, तोच मुळात चुकीचा आहे.  मुलींची कामं वेगळी आणि मुलांची कामं वेगळी हे लहानपणीच मुलांच्या मनावर बिंबवलं  जातं.  बायकांची कामं, पुरुषांची कामं हा भेदच नष्ट केला पाहिजे.  मुला-मुलींना वाढवताना स्त्री-पुरुष म्हणून नव्हे,  तर एक माणूस म्हणून वाढवलं पाहिजे.  समानतेच बीज लहानपणीच मुलांच्या मनात रुजवलं पाहिजे, तरच उद्याचा सुबुद्ध समाज आपण निर्माण करू शकतो.

स्त्री लहान व पुरुष महान असे समजणे ही विकृती आहे.  तसेच दोघेही समान असे समजणे ही  संस्कृती आहे.  मला वाटतं की  None of them is supplementary but both of them are complementary to each other.

मी तर असं म्हणेन की, दोघांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा संसारासाठी, देशाच्या उज्वल भविष्यासाठी  उपयोग करावा व जीवनातला आनंद मनमुराद लुटावा.  संसारात दोघांनी एकमेकांना मदत करावी.  वाट्याला आलेली सुख-दुख्खे हसत खेळत झेलून जीवनाच्या उपवनात खरया  अर्थाने समानतेची फुले फुलावावीत.
त्याचा सुगंध घ्यावा लागणार नाही, तो आपसूक सर्वत्र दरवळेल.


गंगाधर टिपरे ....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा