बुधवार, १० ऑगस्ट, २०११

..पावसाने आज पडायलाच हवे होते का?.



नुकताच धापा टाकत तो घरी आला होता.. तीन-चार माहाच्या वाऱ्याच्या जटील गरम वाफा नमून आज कुठे थोडी काळी गजराजे मेघात साचली होती...विजेच्या व्याघ्र गर्जना परिसर कंपून टाकत होता..सोसाट्याचा वारा सुटला होता..स्वप्नात आलेला देवाचा अवतार, नशिबाचा वार आणि पहिल्या पावसाचा मार याची वेळ आणि निश्चिती कोणालाच नसल्याने रोजचा पोटा-पाण्याकरता सकाळी देवाच्या पाया पडून घराबाहेर पडलेला जनसमुदायाचा थवा परत 'अतिथी' सारख्या दस्तक देवू पाहणाऱ्या पावसाची वाट पाहत पण त्या आधी पोहचलेल्या दरबारी लवाजमा म्हणजेच प्रधानजी वादळ, सेनापती विजा आणि लष्कर वत गर्जनाना घाबरत सैरावैरा आपल्या निवाऱ्याकडे पळत होती...पक्ष्याचा किलबिलाट ही या सर्व धावपळीला साथ देत होता..दुकाने अर्धवट बंद केली गेली होती..नुकतेच रस्त्यावर आलेले फेरीवाले समोरून आड येणाऱ्या गर्दीबरोबर- गाड्या बरोबर कबड्डी कबड्डी करत इकडे तिकडे पाणी पडणार नाही अशी जागा शोधण्याचा शर्यतीत होते.. शहराच्या गर्दीत फार कमी नजरेत पडणारी रस्त्यावरची, बागेतली, नर्सरीतली झाडे, रोपटी मात्र कांदेपोहे कार्यक्रम असल्यासारखे आपल्या प्रियकर पावसाची वाट पाहता लाजून 'हिरवी' झाली होती...शत्रूचा गड सर केल्यासारखे काही जण मात्र आवरत सांभाळत सुखरूप घरी पोहचले होते...त्याच्यासारखे ...!!!...

दरवाजा अर्धा उघडाच होता..तो आत गेला..बुटांच्या दोऱ्या सैल केल्या पण न काढताच सोफ्यावर जाऊन बसला..त्याच्या आगमनाची बहुधा स्वयंपाकघरास चाहूल लागली असावी कारण काही भांडी आपटल्याचा स्पष्ट आवाज चूळ पेटवण्याच्या अस्पष्ट आवाजाबरोबर त्याने टिपला..तस फार आज काम होते असे ही नाही किंवा दमला आहे असेही नाही पण 'आत' कळले असेलच असे गृहीत धरून त्याने 'मी आलो' अशी हाक दिलीच नाही आणि तसेच पाय लांब करत हळुवार पवन क्रीडा दावणाऱ्या पंख्याकडे डोळे लावून तो बसला..चहाच्या उकळीचा आवाज आता येईल आता येईल अशी वाट पाहत त्याने सहजच डोळे बंद केले...त्याला चहा लवकर हवा होता...कारण त्याला ठरवल्याप्रमाणे कोठेतरी जायचे होते...आयुष्याच्या काही मुलभूत आणि महत्वाच्या निर्णयाची आज घडी होती...

'चहा देताय ना..?'
'हो हो आणते' - आतून 
.............
x x x x x x x x x x 

घरातून निघताना पाच-सहा वेळा त्यांनी आरश्यात पाहीले असावे..!!! बहिणीचा लेडीज सेंट, स्वत:चा फुकटचा दिओडरंट, बाबांच्या कपाटातल अत्तर, मग उपलब्ध सर्व क्रीम, लोशन असे हाताला भेटेल ते आठवेल ती सर्व 'अवजारे' त्याने आपल्या सर्वांगाला चिकटवून टाकली होती.!!!!! बहुतेक कोणीतरी मागे उभे राहून सांगतय किंवा शिकवणीत तुझ हे गणित चुकलंय परत सोडव बघू अश्या अविर्भावात कारण नसतानाही केसांची झुलपं त्याने दोन-पाच वेळा 'सेट' केली..तोच प्रकार कपड्यांच्या बाबतीत पण..!!! असं वळून बघ, तसं वळून बघ, थोडे पुढे जावून, मागे वळून, गॉगल घालून, मग परत तो काढून, मग हाताची घडी घालून, एखाद स्माईल देऊन, एक-दोन डायलॉग बोलण्याचा भाव आणून असे सर्व इकडचे तिकडचे उसने प्रकार आटपून आपली Personality साजेशी झाली आहे अस ठाम करून घराबाहेर पडला....'मी जरा जावून आलो गं..' असं बोलला तर खर पण कुणी घरातल्याने ऐकल की नाही एवढ परतून बघायलाही त्याला वेळ नव्हता...

अजूनही ढग आकाशात आरडा ओरडा करत होते..छत्री घेवू की नको?..नको अस लगेच confirm करीत त्याने रिक्षाला हात दाखवला देखील....!!

वारा अजूनही धुम्श्यान घालत होताच.. 
'पावसाने आज पडायलाच हवे होते का?..'  तो त्रासिक नजरेने पुटपुटला. 

ठरल्याप्रमाणे ती बागेत वाट पाहत होती. नुकतीच शिकवणी आटपून आल्याने पुस्तकांचाची थप्पी ही हातात होती. मुद्द्याची गोष्ट म्हणजे ती ज्या शिकवणीत शिकवायची त्यात हे विद्यार्थी होते.!! कधी काळी परिस्थितीने अपूर्ण राहिलेली पदविका पूर्ण करण्यासाठी बाहेरून बसलेले होतकरू उमेदवार..कष्ट करत मोठा झालेला..गुणवत्ता आणि पुढे जाण्याची जिद्द ठासून भरलेला..कोणाच्या अध्यात मध्यात नाही..सरळ मार्गी.. कुठल्याश्या कंपनीत कारकून होता.. प्रमोशन होवोत यासाठी शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करत होता.. कॉलेज करणे वेळेअभावी जमणार नाही म्हणून बाहेरून शिकवणी लावलेला.. आता त्या वर्गात ही सर्वच त्याच्यापेक्षा लहान.. कोणाची आपुलकीची तर कोणाची चेष्टेची नजर त्यावर... हा मात्र आपल शिक्षण आणि आपलं काम यातच.. सर्व रीतसर चालले होते.. एका गोष्टीशिवाय..

मराठी शिकवणाऱ्या बाईसाहेब कु. अंजली फडणीस त्याला आकर्षित करू लागल्या होत्या..दिसण्यात चार चोघी सारख्याच पण समझदार, हसतमुख आणि प्रकार्षित होणारा आत्मविश्वास..अभ्यासाशी फार पूर्वीच ह्याच नाते तुटल्याने अभ्यासात याला त्याला खूप अडचणी यायच्या..त्या सोडवून देताना अंजली बाईंची आपुलकी याला आवडू लागली होती.. ह्याची खरी परिस्थिती तिला जाणवू लागल्यावर तिनेही स्वत: त्याच्या अभ्यासात- त्याच्यावर विशेष लक्ष पुरवले होते..तसा तोही तिला आवडायचा म्हणा...गरिबी किंवा जात असं तिला दुरावा नव्हताच..उलट त्याची कुठलीही गोष्ट शिकण्याची जिद्द, सरळमार्गीपणा  तिला त्याच्याकडे खेचू लागला होता...हे आकर्षण आहे की प्रेम?..चांगल आहे की वाईट?...सांगाव की नको?...या सगळ्या गोष्टीचा गृहपाठ घरी गेल्यावर दोन्ही शिक्षणार्थी आणि शिक्षिका यांच्या मनात अथांग चालत राहायचा..दोन्ही मोठे होत असलेले प्रेमाचे रोपटे अजूनही स्वत:ला एकतर्फी या 'जातीचा' च समजत असल्याने "याच त्याच / तिच पुढे काय होईल?" याची दोन्ही मनाला चिंता होती..कोर्स आता संपण्याच्या मार्गावर आला होता...आता धीराची परीक्षा करणे म्हणजे दिल्ली हरल्यासारखे आहे असे उमगून शेवटी यानेच तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तिला आपल्या मनाची गाथा एका चिठीत मांडून अलगद एकट्यात दिली..त्या चिट्ठीच भविष्य आज त्याला त्या बागेत कळणार होते .. मुद्दामहून आज त्याने शिकवणी हुकवली होती...आणि आता चिठीत लिहिल्याप्रमाणे तिला तो बागेत भेटायला आल होता..थोडासा घाबरत घाबरत..कितीही झाले तरी त्याची शिक्षिका होती..

'.............'-( याच स्मितहास्य मान खाली)
( तिचा राग (लटकाच) डोळे भरून त्याकडे पाहन..)
थोडा वेळ असंच...बागेच्या फुलांच्या मंद सुवासाबरोबर निशब्द...
मग ?..- तो ( काय ठरवलं तू?..विचारायची ताकद नाही )
'मग काय...सब ठीक ..चाललय..'- ती 
'नाही म्हणजे...' - तो ( जीभ चावली परत गप्प)
' सांगू शकत नाही ?..' ( थेट मुद्द्यावर ती)
'अ..हा..म्हणजे..हो...म्हणजे ..तू..नाही..मी...नाही...'...- तो ( पुरती तारांबळ उडालेली)
'हो'........
'नाही..मी सांगणारच होतो...म्हणजे विचारणारच होतो..म्हणजे..तू काही बोललीस?...' - तो 
( ती लाजलेली..पुस्तकात डोक लपवून खाली पाहत...हा माठ्या असाच उभा..!!!)..
'हो.." - तिचा परत एकशब्दी जवाब...
'म्हणजे माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर..'- तो (अजूनही प्रश्नच विचारण्याच्या भानगडीत...!!!)
'नक्की ना?..आयुष्यभर साथ देशील ना?..' ती (अजूनही गमतीच्याच मूड मध्ये..)
' हो ग नक्की..तुझी शपथ..' - तो 
'बघ हा पाऊस ऐकतोय...हा हा हा...हो रे राजा..माझपण...' - ती 
'हो गं..शपथ म्हणजे शपथ...' - तो 

हरलेला डाव अचानक जिंकल्यासारख झाल त्याला..काय करू नाचू..ओरडू..काही सुचेनास झाल..ती अजूनही पुस्तकात बघत लाजत उभी होती...हलक्या हलक्या सारी सुरू झाल्या होत्या..थापलेला मेकअप, भिजणारे कपडे..काही काही कळत नव्हते..ती पण आता वर त्याच्याकडे बघत एका पायाने पायाखालच गवत उकरत तशीच उभी होती..दोन जीवाचं तन-मन-धन कोवळ्या वरुण राजाची कृपा गोळा करत होत...नकळत तिच्या हातातली पुस्तके कधीच खाली पडली होती..चिखलाच्या रंगात सामील होत होती... ते ही पावसाचा आनंद मुकाटपणे घेत होती सारी मोठ्या होवू लागल्या होत्या...पुस्तकांना एवढा वेळ आधार देणारा तिचा हात आता त्याच्या गळ्यात विराजमान झाला होता...तिची तिच्या कंबरेवर त्याची अलगद मिठी जडली होती..चार डोळे एकरूप होण्याचा प्रयत्न करत होते...दोन जीवाचं प्रेमाने एक दुसऱ्यासाठी प्रेमाने कबूल झालेलं सर्वांग आता पावसाने व्यापून टाकले होते...फक्त त्याचे ओठ सोडून..कारण ते कधीच एकमेकात गुंतले होते...वाढलेल्या पावसाने चाहूल देणारी थंडी त्याच्या प्रेमाच्या उबेने कितीतरी वेळ थोपवून ठेवली होती....!!!! 

रीतसर लग्नाच्या तारखा ठरल्या...दोघांचे हात पिवळे झाले....सामाजिक रितीरिवाजात लाल ही झाले...खूप खुश होते ते दोघे...म्हणजे सर्वच..इतके दिवस अभ्यासात तात्पर्य त्यार्थी उत्कर्षात साथ देणारी अंजली आता रेशीमगाठ बांधून पूर्ण जीवनभर साथ देण्यासाठी त्याच्या आयुष्यात आली होती....बाहेरच्या अंगणातल्या तुळशीला पाणी देणारा 'हाथ' आता बदलला होता..देवघरात आईच्या कीर्तनाना साथ देणारा 'गळा' आला होता...मग बाबाची औषधे..त्याच्या वेळा...मग बहिणीचे अभ्यासाचे वेळापत्रक...याच्या बढती झाल्यावर याला कधीच न भेटणाऱ्या फाईली..सर्व सर्व गोष्टी मुकाट्याने वागू लागल्या होत्या... शेजारधर्म तिच्या स्वभावाचा गुणगान गावू लागला होता... तशी सक्ती नव्हतीच तिला पण कुटुंबावर- त्याच्यावर पूर्ण लक्ष आणि प्रेम पुरवता यावे यासाठी तिनेच आपले काम सोडले होते...काही खडे फोडण्यासारख तर दूरची गोष्ट पण आता देवाकडे मागण्यासारख पण उरल नव्हत...सुख म्हणजे काय ही व्याख्या कोणी त्याला विचारावी...!!!!  

सोन्याहून पिवळे त्याच्या नशिबात आले होते..दु:खाचे सर्व ओरखडे आता त्या पहिल्या पावसाच्या साक्षीने आणि कृपेने धुतले गेले होते..तसा दिवाळीचा मुहूर्त पण पहिला पाऊसच आपल्या स्वर्गाच्या गाठीचा दिवस- लग्नाचा वाढ दिवस म्हणून मनाने साजरा करावा असे त्याने कधीच ठरवले होते..मध्येच देवाने अंजलीचा डोहाळे जेवणाचा बेत आखला आणि दुधात अजून साखर पडल्यासारखे झाले...होळीच्या शपथेवर 'अंकित' साहेब पदरात पडले...

.....माणूस जसा देवाचे आभार मानतो तसे हेही मानायचे पण या जीवनाला पावसाची खूप मोठी कृपादृष्टी लाभली आहे असे त्या दोघांना नेहमी वाटे..तेहतीस कोटी देवातला 'वरुण देव' आता त्यांचा कुलदैवत झाला होता...अंकित आल्याने तर आता सुखात अजून भर पडली होती..सर्व घर गजबजून गेले होते..

...
...
आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता...!!! तोच पहिला पाऊस..!!! त्याला कल्पना आली होती..आजचा पडेल अशी..ऑफिसला गेल्यावर अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती.. दोघेही मस्त भिजायला जाणार होते..तसेच..पूर्वीसारखे... हातात हात घालून...किती मज्जा येणार नाही...?...आज तर अंकित पण असेल की...याहू.....

तरी घरी जाईपर्यंत थोडा भिजलाच तो..........

x x x x x x x x x x 

'भिजलास काय रे?...टॉवेल आणू?...'आतली व्यक्ती बाहेर आली..
नाही...वाचलो...पण आता जाताना भिजेन बहुतेक...- तो 
हा घे चहा....- ती 

..ती त्याची आई होती..!!!!

हे बघ बाळा..मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते..भावना आहेत..दु:ख आहे..पण आता अंजली 'जावून' पाच वर्ष झालीत रे...किती वेळ असंच राहणार.?..तुझा नाही कमीत कमी अंकित चा तरी विचार कर ..त्याला आई म्हणजे काय असते ते कळू दे की..नंतर खूप त्रास होईल रे त्याला...शुभांगी चांगली मुलगी आहे..तिला सर्व गोष्टींची कल्पना दिली गेलीली आहे..बाबा पुढे गेले आहेत त्यांच्याकडे..जा फ्रेश हो जा आणि जावून ये...जा बाळ असा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागणार होता ना ...चल आजच समझ...जा..देव काहीतरी मार्ग काढतोय बघ...

'अंकित कुठे आहे..?..' - तो
'पोट्ट्या ऐकतोय कुठे?..दार उघड दिसल पळाला बाहेर..अंगणात असेल बघ..'
'अंकित..अंकित...येतो मी...' - आईला सांगून तो बाहेर निघाला...

सरी आता मोठ्या झाल्या होत्या...अंगणातल्या रोपाबाजुच्या छोट्या पायवाटीत पाणी साचून एक लहानसा ओढा तयार झाला होता..अंकित त्यातच हात पाय मारीत काहीतरी गोळा करीत होता..एक भिजणाऱ्या कागदाची होडी बनवून तिला पोहते ठेवण्याचा प्रयत्न करत होता...बाबांना बघून खुश झाला..बोबड्या तोंडाने ते आपले पराक्रम दाखवू लागला...त्याने पण पुढे जाऊन स्मित हास्य देत त्याचा लटपटता हात धरला..

'जा बच्चा, घरी जा पावसात भिजू नको नकोस ..आजी आहे बघ..खाऊ देईल..'
'बा..बा...ती होली...' - अंकित..बोबडत..
'अरे वाहः.. मस्त आहे..जा आता आत जा हा..' - तो 

ट्रिन ट्रिन.. ट्रिन ट्रिन.. त्याचा फोन वाजला...( बाबाचा होता..)
'हलो..हा बाबा...निघतोय..'

'बा..बा..मी पण येणाल ...' - अंकितचा हट्ट 
'नेईन हो..पुढ्या वेळी नक्की हा...बाळा..जा आत जा.. हा बाबा १५-२० मिनटात येतो मी..' - तो अंकित आणि फोनवर बाबा दोघांना सांभाळत बोलला..

'नक्की?..' - इति अंकित 
'नक्की बेटा..' -तो  'जावू मी ?..' -तो

त्याच्या उत्तराची वाट ना पाहता तो निघायला तयार झाला..अंकितचा मुका घेतला..फोन बंद केला..आणि चालू लागला..आणि....
आणि...आणि...

वीज अंगावर पडली असा तो थांबला...चटकन मागे वळला..कारणही तसे होते..आणि अंकित चे उद्गारही...

'पाऊश मामा ऐकतोय ना?..मी पण जाणाल नंतलला ..बघा हा बाबा पाऊश पण ऐकतोय...' 

तो गुढघ्यावर बसला..हा सहा वर्षाचा चिमुरडा काय बोलून गेला हे?..त्याने नजरेनेच अंकित ला जवळ बोलावले..पाऊस मोठा झाला होता...त्या दिवशी सारखा...त्या पहिल्या दिवशी सारखा..तसाच त्याच्या सर्वांगाला भिजवीत होता...पण डोळे सोडून..

कारण डोळे मात्र आत साठलेले पाणी मोकळे करण्यासाठी पावसाच्या पाण्याशी स्पर्धा करत होते...ते अंजलीला शोधत होते..गढूळ पाण्यात एक प्रेमाची आठवण स्पष्ट होत होती...बाबांचा फोन पुन्हा एकदा ट्रिन ट्रिन करत खिशात बोंबलत होता..आई दारावर अंकितला घ्यायला बाहेर आली होती...अंकित मात्र बाबाच्या कुशीत येवून चिमुकल्या डोळ्यांना त्रास देणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे वर बघण्याचा प्रयत्न करत होता...

आता पर्यंत मानसिक सबळ असणाऱ्या त्याच्या सहनशीलतेला तडा गेला होता.. मन त्याला विचार करण्यासाठी सारखे सारखे निरोप पाठवत होते..नियतीने फुकटात दिलेल्या वेड्या पिश्या गजराजासारख्या भासणाऱ्या एकटेपणाला ज्या एका 'मी'पणाच्या अंकुशाने रोखून ठेवलं होते..त्याला आता 'अंकित'च्या बोलक्या प्रेमाने नाहीशे केले होते....

काय हेच प्रेम शुभांगी त्याला देवू शकेल?...काय तिला तिच जीवनही सुखात घालवता येईल माझ्याबरोबर...??..
..
( प्रश्न असंच त्याचा सारखा पावसात भिजत होता...उत्तर मात्र दूर दूर पर्यंत दिसत नव्हते...)
..


शुभांगीच्या हाताने बनवलेले पोहे थंडपणे त्याची वाट पाहत होते..आणि आकाशात एक ओळखीचा ढग खूप जास्त रडल्यासारखा पाणी फेकत होता...( ती अंजलीच असावी..)

आणि हा...
हा मात्र अंकित कडे बघत होता...बडबडत होता...रडत होता..

' हा बेटा..पाऊस मामा ऐकतोय ना?.. मी आहे ना..शपथ म्हणजे शपथ.......'

x x x x x x x x x x 

'पावसाने आज पडायलाच हवे होते का?..' - कोणीतरी पुटपुटलंच...
कोण तो?..

तुम्ही तर नाही ना....?..
असो..

तनवीर सिद्दिकी...

1 टिप्पणी: