बुधवार, १० ऑगस्ट, २०११

बोकडाचं काळीज..

Mahesh Haul Patil


आनंद...गावातली चिली-पिली त्याला "आन्द्या" म्हनायची..तिसरीची परीक्शा झाली अन आन्द्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या..
माय गाभन शेळी घेउन दुसर्याच्या रानात रोजानं जायची...८ दिवसात शेळीनं एका तांबड्या-काळ्या बोकडाला जन्म दिला अन १५ दिवसात खरकुत येउन मेली...आन्द्या बोकड घेउन मायीसंगं रानात जायचा...बोकडासाठी बाभळीच्या शेन्गा पाडुन त्याला खायला घालायचा..वाण्याच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा चोरुन बोकडाला खाउ घालायचा...बोकड डोळे मिचकावित गपागप खायचं..दिड-दोन महेन्यात बोकड एकदम तयार दिसु लागलं..आन्द्याचं न त्या बोकडाचं असं काय नातं जुडलं कि २४ तास दोघं बी सोबतंच असायचे..जणु काय दोघांचं काळिज एकच....आन्द्या दिवसभर त्या बोकडासंगं गप्पा मारायचा..बोकड त्यच्या गोबर्या गालाला चाटायचं...रातच्याला झोपताना बोकड आन्द्याच्या जवळच झोपायचं..
  शनिवारी रात्री अचानक आन्द्याचा मामा वाडीहुन तेच्या पोराच्या जावळाचं आवतण घिउन आला..मामा चांगला गबरगंड सावकार होता..."आक्के, सोमवारी तु आन आन्द्यानं सकाळीच यायचं बर का..." मामा म्हनला..बसल्या बसल्या त्येची नजर आन्द्या अन बोकडाकड गेली.."बोकड चांगलंच तयार झालंय गं आक्के...१४-१५ किलो तर मटन सहज पडल बघ.." माय म्हनली,"आन्द्याचा लय जीव हाय त्या बोकडावर, म्या बोकड ईकणार न्हाय..."जेवणं उरकुन माय आन मामा आंगणात बोलत बसले..आन्द्या अन बोकड तवर झोपी गेले..."आन्द्याची शाळा पुढल्या सोमवारी सुरु हुईल..यंदा चवथीत बसल पोरगं...त्येला नवी कापडं अन वह्या पुस्तकं घ्यावी लागत्याल..पर जवळ दमडी न्हाय, दोन-तीनशे रुपय दिलस तर लय बरं हुयील बघ..म्या हाडाची माती करुन तुझा पै-पै फ़िडुन टाकिन.." मामा म्हनला, "आक्के, तु काय मला परकी हायस व्हय गं...पर माज़्या बी घरी पोराचं जावळ हाय...जरा तंग हाय.."
मग हळुच बोकडावर नजर टाकुन मामा म्हनला,"तेवढं बोकड मला दी, आसं बी म्या बाजारातुन आणनारच व्हतो...त्या बोकडाची दोनशे रुपय आन आन्द्याला आयेर म्हनुन शाळंची कापडं म्या देतो..." माय म्हनली,"आर आन्द्याचा जीवच त्या बोकडात हाय..."
"आक्के, पोरगं ल्हान हाय आजुन, दोन-चार दिवसात जाईन इसरुन...बघ सकाळ पस्तोर इचार कर आन सांग मला..."
पहाटं-पहाटं, आन्द्या उठायच्या आत, मायीनं बोकड सोडुन मामाच्या हातात दिलं...आन्द्या उठुन बोकड हुडकाया लागला..पर बोकड काय दिसंना..गावभर हिंडला...मायीला इचारलं, वाण्याच्या शेतात, वड्याला...
दिवस मावळायच्या टायमाला घरी आला..मायीनं त्येला मामाच्या वाडीला जायचं सांगीतलं..पर आन्द्या काय तयार हुईना..मामा नवी कापडं देणार म्हनल्यावर मग कसातरी तयार झाला..
दुसर्या दिवशी येरवाळीच माय-लेक पायीच वाडीला निघाले..दिवस मावळायच्या टायमाला वाडीला पोचले..मामाच्या दारात मंडप टाकलेला..पावणं-रावळं..गर्दी..मामी लाल भडक लुगडं नेसुन मिरवत व्हती..मांमा बी त्येच्या राडयात व्हता...ह्या माय-लेकाकडं कुणाचंबी ध्यान नव्हतं..
पोराचं जावळ काढुन झालं..."मुलानी" सुरा घिउन हजर व्हता..आन्द्या मधल्या खोलीत पत्र्याकड तोंन्ड वासुन बसला व्हता..
तेवढ्यात मुलानीनं पाणी पाजुन बोकडाच्या मानंला सुरा लावला..बोकड कर्कस वरडलं...आन्द्यानं लगेच तेच्या बोकडाचा आवाज वळकला..आन पळत बाहीर जाउन बघतंय तर काय...बोकडाचं मुंडकं एकिकड अन धड एकिकड...आन्द्यानं जोरात बोम्ब ठोकली..
गड्बडा लोळाया लागला...इरसाल गावठी शिव्या हासडु लगला..माय धाउन आली..पावणं नुस्तं बघु लागली...मायीला आन्द्या काय आवरता आवरंना...मामीचा पारा चढला..."पावण्यासमोर इज्जत घातली कार्ट्यानं..शिरप्या, उचल त्या कार्ट्याला अन मधल्या खोलीत कोंडुन टाक.." मामी मायीला बी काय-काय म्हनु लागली..दोन गड्यानी मिळुन कसातरी आन्द्याला आवरला आन मधल्या खोलीत नेउन टाकला..तासाभरात खमंग आमटीचा वास सगळीकड पसरला..पावणं-रावळं मिटक्या मारुन मटन खाउ लागली..मामीनं ठरल्याप्रमाणं आन्द्याची शाळंची कापडं अन शम्भराच्या दोन नोटा मायीच्या हातावर टेकिवल्या...सगळ्याची जेवणं झाल्यावर आन्द्याला अन त्येच्या मायीला बी पंगतीत बसवलं...शिरप्यानं दोघात एक परात मायीपुढं ठिवली..मामा हातात बकेट घेउन आला..."आन्दा...पोरा असं येड्यासारकं करु नी...घी..तुझ्यपायी स्पेसल पीस काढुन ठिवला व्हता.." असं म्हनुन बोकडाचं उकड्लेलं काळीज परातीत टाकलं..
मायचा इतका येळ आवळुन धरलेला आवंढा आन डोळ्यातला पाझर फ़ुटला....काळीज फ़ाटलं....तशीच उठली, आन्द्याला काकंत घेतलं...शाळंची कापडं आन नोटा तिथंच टाकुन निघाली..झपाझप पावलं टाकीत गावाकडं..अन्धारात..अनवाणी...!

महेश....

Mahesh Haul mahesh.haul@hotmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा