बुधवार, १० ऑगस्ट, २०११

आदरणीय पु.लं....सप्रेम नमस्कार...!


image.png

आदरणीय पु.लं....सप्रेम नमस्कार...!

'एक झुंज वाऱ्याशी' द्यावी त्याप्रमाणे आपण मृत्यूशी कणखर झुंज देऊन, 'मराठी वाड्मयाचा गाळीव' इतिहास मागे ठेवून, तमाम रसिकांना पोरकं करून निघून गेल्याला आज एक तप झालं. आपल्या जाण्याने 'ती फुलराणी' देखील कोमेजली..! आपण गेलात तरी वाचकांशी असलेलं आपलं 'मैत्र' आपल्या साहित्याच्यारुपाने आमच्या हृदयात चिरंतन राहील..! 'नारायण, सखाराम गटणे, नामू पारिट, अंतू बारावा' यासारख्या अनेक 'व्यक्ती आणि वल्ली' देखील आपल्या जाण्याने हळहळल्या असतील. शेवटी, आयुष्य म्हणजे तरी काय? 'तीन पैशाचा तमाशा..!' आपल्या निघून जाण्याने आम्हा सर्वांची नियतीने घोर 'फसवणूक' केली असली, तरी आपल्या अभिजात वाड्मयाने यापुढच्या पिढ्यांचीही 'हसवणूक' होतंच राहील.

आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, आमच्या पिढीने पु.लं. पाहिले..! वाचले...!! ऐकले...!!! 'खोगीरभरती' झालेल्या मराठी साहित्य विश्वातील 'मोठे मासे छोटे मासे' स्वतःला 'अंमलदार' समजतात. त्यांनी कितीही 'वटवट-वटवट' केली, तरी आपल्या लेखनाची 'अपूर्वाई' इतरांच्या साहित्यात आम्हाला कधी वाटली नाही.

आपण काही 'अघळ-पघळ' जरी लिहिलं, तरी ती कधी 'नसती उठाठेव' झाली नाही. आपल्या प्रत्येक कलाकृतीला रसिकांची मनापासून 'दाद' मिळत गेली. आपल्या प्रत्येक लेखनाने साहित्यातले एक 'नवे गोकुळ' निर्माण केले. आपल्या शाब्दिक कोट्याची 'पुरचुंडी' सुदाम्याच्या पोह्याप्रमाणे आम्हाला कायम मेजवानी वाटली.

विनोदाच्या वस्तऱ्याने आपण अनेकांची 'खिल्ली' उडवली; पण कुणाला जखमी करण्याचा हेतू त्यात कधीच नव्हता. वेळप्रसंगी आपण निर्ढावलेल्या राजकारण्यांना 'राजा औदिपौस' च्या थाटात 'चार शब्द' देखील सुनावले, पण राज्याकार्त्यांनिसुद्धा आपल्यावरच्या 'आपुलकी' मुळे आपल्याशी असलेलं 'गणगोत' प्राणपणाने जपलं...! 'गुण गाईन आवडी' म्हणत आपण अनेक प्रतिभावंतांची आम्हाला ओळख करून दिलीत.

आपल्या अमोघ वक्तृत्वाने आम्हाला आपण 'रसिका हो...! मित्र हो...!! श्रोते हो....!!!.' अशी प्रेमपूर्वक 'दाद' दिली. तेव्हा आपल्या अजरामर साहित्याने आमचं उरलं-सुरलं आयुष्य 'पुलकित' होऊन गेलं..! आपल्या आठवणीचे 'पूर्वरंग' पाहून त्यांची 'गोळाबेरीज' केली तर आमच्या मनात सदैव साठून राहील 'पु.ल. एक साठवण...!'

आपला,

गंगाधर टिपरे...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा