बुधवार, १० ऑगस्ट, २०११

रंग पावसाचे

Alka Aserkar Alka Aserkar


नभ उतरू आलेले शिखरांच्या माथ्यावर...आज पुन्हा गीत नवे माझ्याही ओठांवर....कवी हेमंत राजारामच्या या ओळी खूप आवडतात मला पाऊस ....तीन अक्षरी शब्द केवळ......पण तो उच्चारताच किती किती अर्थ ध्वनित होत राहतात त्यांतून.....प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक कोटुंबिक, व्यावसायिक, स्थानिक  पार्श्वभूमी तसंच वय, लिंग परिस्थिती,  ...या सगळ्यांना अनुसरून हे अर्थ प्रतित होत राहतात...मनात घूमत राहतात... ग्रीष्माला वळीवाची आस लागली की मृगाच्या धारांची वाट आपणही चातकासारखी पाहायला लागतो..त्याच्या येण्याच्या तारखा डीक्लेअर्ड होत राहतात....केरळच्या किना-यावर त्याचं पाऊल पडलं की त्याच्या  पुढच्या प्रत्येक मुक्कामाच्या बातम्या व्हायला सुरूवात होते...पण आमचे ज्येष्ठ कवी व.शं. खानवेलकर म्हणतात त्याप्रमाणे पावसाच्या बातम्या या वर्तमानपत्रात कधीच वाचायच्या नसतात. त्या विचारायच्या असतात  झाडांना, पाखरांना...रंग बदलत जाणा-या आभाळाला..थंड होत जाणा-या वा-याच्या झुळुकीला.....मग बळीराजा त्याची गणितं मांडायला सुरूवात करतो...पण वर्गातल्या गणितात कच्च्या असलेल्या मुलासारखीच त्याची स्थिती असते बहुधा .....सुदैवानेच पास झाला तर झाला.....गृहीणी उन्हाळी कामांचा शेवट करत आणतात....शहरवासीय वर्षासहलींचे बेत आखू लागतात.....मुंबईसारख्या महानगरात पावसाआधी गटारांची चर्चा करावी लागते....लोकलची स्थिती तपासावी लागते.....खेडयातल्यांना घरं शाकारावी लागतात....कवींना याच्या स्वागतासाठी शब्दांचा पाऊस तयार ठेवावा लागतो...प्रत्यक्ष पावसात भिजण्याऐवजी शब्दांच्या पावसात भिजण्यावर त्यांचा जास्त भर असतो....सर्वसामान्यांना पाऊस म्हटला की आधी छत्र्यांचे वेध लागतात....होता होईतो जितकं कोरडं राहता येईल तितकं बरं...अशा पंथातले लोक या वर्गात मोडतात....
मग तो येतोच.....बहुधा अनपेक्षितपणेच गाठतो.....तारांबळ उडवतो....मग बरसतो....कधी.रीमझीमतो, कधी कोसळतो, कधी टपटपतो, पाऊस म्हणजे सूर...लय...ताल....जोडीला वा-याची बासरी अन् ढगांचा मृदुंग....बिजलीचं नृत्य अन् झाडांचं घुमणं........पृथ्वीच्या रंगमंचावर हा बहारदार खेळ सुरू होतो.....आणि तो जगन्नियंता अजूनही या पृथ्वीवर, इथल्या प्राणीमात्रांवर आणि विशेषतः मानवजातीवर रूसलेला नाही याची खात्री पटते.....
पाऊस म्हणजे संगीत...पाऊस म्हणजे विरहगीत..पाउस म्हणजे सैगलचं गान अन् लताची सुरीली तान....पाऊस म्हणजे भिजलेली मधुबाला आणि ऱफीचा मधाळ स्वर...पाऊस म्हणजे हिंदी सिनेमा...सावनचे झुले....आणि संदेसे....पाऊस म्हणजे गरमागरम चहा....मक्याचं कणीस....कांदा भजी.....पाऊस म्हणजे कागदाची होडी....प्रियेची खोडी...दोन मनांची जोडी....पाऊस म्हणजे रोमान्स....रेन डान्स...पाऊस म्हणजे दोघात एकच छत्री....झोपडीला ताडपत्री...पाऊस म्हणजे त्याची आठवण...तिचं वाट पहाण्...पाऊस म्हणजे हुरहूर..मनात विनाकारण काहूर...अन् डोळ्यातला पूर....पाऊस म्हणजे मोराची केका...मनमोराच्या हाका..पृथ्वीचं न्हाण....सृजनाला आव्हान...पाऊस म्हणजे थरथर पान, भिजरा माळ अन् हसरं रान.....पाऊस म्हणजे खळखळ ओढा....नदीला अवखळ पूर...सा-या आसमंताचा न्याराच नूर.....पाऊस म्हणजे कालीदासाचा आषाढ....बोरकरांचा श्रावण....पृथ्वीला लागलेला पाचवा महिना....पाऊस म्हणजे मेघशाम....पाऊस म्हणजे यमुना..पाऊस म्हणजे गोवर्धन....पाऊस म्हणजे कृष्णाची वेणू....अन् सप्तरंगी इंद्रधनू...पाऊस म्हणजे
माझा कवी मित्र हेमंत राजाराम म्हणतो.. 'जवळचा तरी मानाचा....पाऊस पाहुणा रानाचा...'
किती किती वर्णन केलं तरी ते अपूरंच वाटावं असा हा पाऊस.....कधी कधी पाऊस म्हणजे पूर भरपूर....जिकडे तिकडे चिखल.....घाण...गोरगरीबांची दाणादाण.....लोकल्स बंद...प्रवास ठप्प.....अवकाळी पिकांचं मरण....अन् शेतक-याचं सरण....पण यातील बहुतांश गोष्टींना आपणच कारण...... एक शायर म्हणतो की...मिजाज बारीशका हमसे पुछो.....हम जो कच्चे मकानके वासी है......खरंच या पावसाची रूपं किती...तर या पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव निर्जीव प्राणीमात्रांच्या संख्येएवढी.....प्रत्येकाच्या तनामनातला पाऊस वेगळा.....
-अलका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा