बुधवार, १० ऑगस्ट, २०११

देवाजीचे पुस्तकं वाचा, गवसेल माणुसकीचा साचा!

Mangala Bhoir

           सामाजिक कामात वाहून घेतलेले असें माझे माहेर, त्यांनी   जाती -पाती मानत नाही हे आपल्या घरातून उदाहरण  दाखविण्या साठी माझे लग्न मागास जातीत  करून दिले . मी ७ वर्षांची असताना पितृछत्र  हरवले,१८ वे वर्ष  सुरू झाले,आणि लग्न होवून पुण्यातून कोकणातील गावी रोपटे रुजले. या रोपट्याला  इतक्या विषम वातावरणात जगणे फार कठीण होते.माहेरची ब्राम्हण,शहरात शिकलेली,आणि  इकडे घरातील  मोठी सून व १० माणसांची जबाबदारी शिरावर आली. शिक्षित कुटुंब असले तरी मागील पिढी अशिक्षित होती. घर या वस्तीच्या भागातच होते. शिवराळ भाषा,राहणीमान  पाहून हबकून गेले होते. आईने सांगितले की चुलीतले लाकूड चुलीत जाळले पाहिजे. रडून काही साध्य होणार नव्हते. प्रथम विरोध पत्करून येवून-जावून  १ मूल होते तरी बी एस सी पूर्ण केले. 
          माझ्या मावस सासूबाई गेल्या तेव्हा वस्तीतीतील लोक आले व म्हणाले दारू मिळाली तर रात्रभर रडायला बसू, तेव्हा मी त्यांना सांगितले की दारू मिळणार नाही,तर सावकाराने त्यांना फतवा काढला की कोणीही जायचे  नाही,आणि मित्र-परिवाराचे सहाय्याने  क्रिया-कर्म उरकले. या घटनेवरून चिडून न जाता मी तेथे सामाजिक काम करण्याचे ठरविले. प्रथम घराच्या ओटीवर सारवून,घरो-घरी फिरून मुलांना संस्कार वर्गाला पाठवा म्हणून समजावले,परंतु,पुन्हा त्यांना सावकाराची भीती. घरातून मला विरोध, भटाला दिली ओसरी,आणि भट हात पाय पसरी हे टोमणे. मी  शेजार-पाजार ची ४-५ मुलांना आणि माझ्या मुलांना घेवून वर्ग चालू केला. स्वच्छता, गाणी,गोष्टी ,खेळ,श्लोक,पाढे  असें सुरू केले. बाकीची मूले लांबूनच पाहत,हळू-हळू एक-एक मूल येवू लागले,कोणी कडेवर लहान बाळाला घेवून बसायचे. शेंबडी-लोम्बडी पोरे घेवून बसते,म्हणून घरात शिव्या.  
        मोठा मासा लहान माशाला खात असतो. तो त्याचे आर्थिक,शोषण करतोच आणि त्यातील माणसाचा गुलाम करून ठेवतो. नीतिमत्तेचा पायाच ढासलवतो ही सावकारी लोकांचा पैसा,जमीन जुमला,त्यांच्या स्त्रिया-मुलां पासून सार्यांचेच शोषण करतो हे मी पहिले. माझ्या कुटुंबात कोणावरही अन्याय झालेला मला सहन होत नसे. अगदी सासूवर सासर्यांनी हात उगारला,तर तो हात धरण्याचे काम मी करे. सर्वांच्या दृष्टीने मी आगावू ठरले होते. त्यामुळे कौटुंबिक  मानसिक त्रास अधिक सहन करावा लागत होता. घरातही शेतातील आलेल्या गड्यांना वेगळे अन्न,फुटके कप दिले की मी समजवायचे  की हे चालणार नाही. आणि सर्वाना समान वागणूक द्याला हवी म्हणू झगडायचे.  ब्राम्हणांनी तुम्हाला जातीभेदाने वागवले म्हणता,आणि तुम्ही इतरांना तसेच वागवता,मग दुसऱ्यांना दोष का देता हे मी सांगायचे . आपल्या घरात आधी लक्श घालायलाच हवे. खूप समतोल राखावा लागतो. कधी चुका नसतना माफी मागावी लागते,पण करायचे ,त्यातच अहंकार मरून जातो. मुलांना वस्तीतील  मुलांमध्ये सामील करायचे नाही,असें घरातून दर्डावायचे. ओटी सारवून,मुलांचा वर्ग नीट चालू झाला,पण सावकारीन त्यावर पाणीच टाक,खरकटे टाक ,तुमच्या आवाजाचा त्रास होतो,भांडणे  करू लागली. 
       वस्तीतील बहुतांश स्त्री-पुरुष दारू सेवन करीत,व रोज घरा घरातून भांडणे. प्रथम शेजारी असलेली फुग्याची (गावठी) दारू विकणाऱ्याला    पोलीसान  करवून  धमकी  दिली,त्याला  मी सरबताची  गाडी  नाक्यावर  लावून  दिली,आणि हा  गुत्ता  बंद  केला. आता  लोकांचा विश्वास  माझ्या वरील  वाढत  होता. मला सारे  काकू  म्हणत.  आमच्याच  घरातील  बाजूच्या  एका  खोलीत  मी लोकांची  बैठक  घेवू  लागले. वस्तीतील चव्हाट्याच्या  जागेची  कागदपत्रे  मी कचेरीतून  आणली ,ती  जागा  सावकाराची नसून  त्यावरील  देऊळ  व जागा  सर्व  समाजाचे  आहे  हे सर्वाना  बैठक  घेवून समजावून  सांगितले. चव्हाट्या च्या  जागेतच  संस्कारवर्ग  भरू  लागला . त्याचा  परिणाम  असा  झाला,की जो  तो आपला  परिसर  स्वच्छ  ठेवू  लागला ,पाणी  शिपडून  चव्हाट्याची  जागा  स्वच्छ  झाली . देवळाची  किल्ली ,सावकाराकडे ,ती  आणण्या साठी गावातील  ज्येष्ठ  लोकांना  सांगितले. देऊळ  वस्तीसाठी  खुले  झाले,आमच्या  बैठकी  तेथे   होवू  लागल्या .
       स्त्रिया बैठकीला  कमी  प्रमाणात  येत ,त्यासाठी आपल्या धार्मिक  कार्यक्रमांचा   आधार  घेवून कार्यक्रम  सुरू केले.  स्त्रियांचे  वेगळे  मंडळ  तयार  केले. बचत  खाते  सुरू केले.स्त्रियाही  सर्व  कार्यक्रमात ,अगदी खेळातही  भाग  घेवू  लागल्या .समाजाचे  एक रजिस्टर  मंडळ  स्थापन  करून त्यावर त्यांच्यातील  ज्येष्ठ व  तरुण  मिळून  कार्यकारिणी  केली . घरटी महिना  20 रुपये  वर्गणी  ठेवली . संक्रांत हळदीकुंकू ,गणपती -नवरात्री  उत्सव ,भोंडला,कृष्ण  जन्म ,15 ऑगस्ट -26 जानेवारी , विविध  खेळांच्या  स्पर्धा , आरोग्य  शिबिरे ,निरनिराळ्या  विषयांवर  समाज -प्रबोधनपर  व्याख्याने   इत्यादी  कार्यक्रम  आखले  गेले. दारू- जुगारीचे प्रमाण  कमी होवू लागले.  मुला-मुलींचे  शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले सर्वाना आदर युक्त    भीती होती,त्यामुळे तरी लोक ऐकत असत  .गोळा  होणाऱ्या  वर्गणीतून  सर्व  कार्यक्रम  पार  पडायचे  ठरले. आर्थिक दुर्बल  कुटुंबातील  मृत व्यक्तीनच्या   जाळीत  साठीही  पैसे  नसत  ,त्यामुळे  त्यांची  प्रेते  पुरली  जात ,त्यांना जाळीत  साठी रक्कम  तरतूद  केली  गेली . कोणाच्या  घरी मयत  झाले तर दारू न पिता  कोरा  चहा  प्यावा ,तेराव्या  दिवशी  दारू- मटना  ऐवजी ,सोडा  व उकडलेली  अंडी   असें सुरू केले. आता  वाचणाऱ्याला  वाटेल  हे काय ,परंतु समाजात  एकदम  प्रथांना  विरोध करून तुम्ही  त्यांचा  सर्वांगीण  विकास  साधू  शकत  नाही. 
       कामाचा  व्याप एकटीने   सांभाळणे  कठीण   होते,कारण  रोज एक-एकांचे  भांडण  मितव ,कोणावर  रॉकेल  ओतले  तर तिला  वाचवायला  जा , सावकाराशी  भांडणे, कोणाचे लग्न लावून दे,कुणाचे बाळंतपण कर  अशा  अनेक  तऱ्हा . पोलीस  आणि वकील  याकडे  लोकांनी जावू  नये  त्यामुळे मला ते  निस्तरावे  लागे .  माझ्या इतर  मैत्रीणीना  घरोघरी  जावून  सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त  केले. त्यातील मला कार्यकर्त्यांचा  संच  मिळाला . वस्तीतही   कार्यकर्ते  तयार  झाले होते. आरोग्य  शिबिरे  नेहमी  भरवणे  गरजेचे  होते,कारण  येथे  घरा-घरातून क्षयरोगाच्या  केसेस  होत्या . खरुज- नायटा  कातडींचे  रोग  इत्यादी . डॉक्टरांना  भेटून  त्यांच्याकडून  औषधे  व त्यांचे  साहाय्य  मागितले . सर्वांच्या सहयोगाने  कार्य  सफल  होवू  लागले.
       हमालांची वस्ती  जवळच  होती,त्यांच्यातील  महिअलन  ज्ञानेश्वरी  वाचण्याची  इच्छा  होती,माझ्या मागे  लागल्या  बाई  तुम्ही  शिकवा  आम्हाला . तेथे प्रौढ  साक्षरता  वर्ग चालवला ,आणि तो सफल  झाला.  जेव्हा  निरक्षर  सरस्वती  ज्ञानेश्वरी   वाचू  लागली,तेव्हा माझा  आनंद  गगनात  मावेना . हे सर्व कार्य वाढीस  लागले गावात असें ६ संस्कार केंद्रे महिला कार्यकर्त्यांनी चालवली. मी स्वतः सायकलवर फिरत असें,नंतर  जुनी लूना  घेतली,जुने कपडे गोळा करून आणून गरजूंना देत असें. मला आधुनिक बोहारीण म्हणत .  शाळा-शाळेतून फिरून शिक्षानाधीकार्यांशी चर्चा केली. अनेक मुळे सरकारी शाळात चौथी  पर्यंत गेली  तरी बाराखडीही येत नव्हती.  वस्तीतील मुलासाठी अभ्यास  वर्ग ठेवले. तरुणांना त्यांना शिकवण्यास  प्रवृत्त केले. एक-मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे प्रत्ययास आले  ! 
        महिला सुरक्षा समितीचेही काम केले. काम करताना  अनेकांच्या  धमक्यांना  तोंड  द्यावे  लागे .  महिलांसाठी पापड उद्योग अंगणात चालू  केला. मुलांसाठी मला अर्थार्जन करणे गरजेचे होते,शिवाय मला स्वतचे पैसे असले म्हणजे लोकांना अडी-नदीला मदत करता यावी,म्हणून मी माझा कारखाना आणि दुध डेरी व्यवसाय चालू केले. यातून वस्तीतील  काही जणांना  रोजगार उपलब्ध झाला. घरातही मदतनीस म्हणून ठेवल्या. घर-संसार ही तारेवरची कसरत होती. मुलांचे अभ्यास,आजारपणे,दीर-नंदांची लग्ने, बाळंतपणे, ६-७ लहान मुलांचे  पाहणे ,३ सासू-व सासरे यांचे ताल सांभाळणे, हे सारे करण्यात वारंवार आजारी पडू लागले. मला २६ व्या वर्षीच rhumatik arthritis झाला . माझ्या इच्छा शक्तीने सर्वावर मात करीत  सारा गाडा पुढे खेचणे चालू ठेवले. नंतर आदिवासी भागात ३ वर्ष काम केले,त्या साठी मला या वस्तीतीलच कार्यकर्ते मिळाले. कुटुंबीय,समाजातील दानी लोक,बँका, सर्वांच्या  सहकार्याने  सामाजिक कार्य करता आले. माझ्या कुम्बियाना माझ्या या कार्याचा निश्चितपणे त्रास सहन करावा लागला. 
      मला प्रकृतीमुळे २००१ सालानंतर थांबावे लागले, सासू-सासऱ्यानची  सेवा घडली हे माझे भाग्य,त्यांच्या आशीर्वादाची  पुंजी मिळाली,त्यांची लाडकी झाले होते. माझ्या पाठीशी संकट काळी तेच धावून आले.  आज ते नाहीत,परंतु त्यांचे आशिर्वाद मला सुखी जिवन देत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी व माझ्या प्रकृती साठी पुण्यात स्थाईक झाले. येथे  माहेरच्या   लोकांची ही  मदत लाभली  माझ्या मैत्रिणीनी  जे कार्य आम्हाला अपेक्षित होते ते खूपच वाढवले आहे. मला त्यांचा सार्यांचा अभिमान वाटतो. माझ्या जिवनातील २० वर्ष तरी मी कार्य करू शकले,त्यामुळे मला हे देवाजीचे पुस्तकं वाचता आले,आणि माणसात देव गवसला. माझ्यातील माणुसकीचा साचा गवसला! ज्याला मी नरक समजत होते,तेथेच मला स्वर्ग गवसला. 
      मी कोणत्याही कार्यात पदस्थ झाले नाही, कोणालाही कधी जामीन राहिले नाही  ही पथ्ये कामात पाळली. माझ्या कर्म भूमी  तील या जन  सागरातील मी एक बिंदू होते. मी तेथे नसण्याने फरक पडणार  नव्हता, एक खांबी तंबू नसावाच! कार्यकर्त्यानची  दुसरी फळी उभी राहिली त्यामुळे मी आज शांतपणे जिवन जगत आहे. आज वस्तीतील,गावातील ,आदिवासी पाड्यातील  जी मूले-मुली चांगली शिक्षित ,उच्च शिक्षित झाली,मोठी झाली,निर्व्यसनी निघाली, ज्यांची लागा लावून दिली ती सुखाने नांदताना पाहून आंतरिक समाधान मिळते आहे.  
                                                                                                                                                
मंगला 

Mangala Bhoir bhoirmangala@gmail.com 

       
       
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा