बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गावाकडचा पाऊस


Alka Aserkar
पाऊस....शब्द एकच...पण प्रत्येक ठिकाणची त्याची रुपं वेगवेगळी....शहरातला पाऊस, खेड्यावरचा पाऊस, रानातला पाऊस, शेतातला पाऊस....सगळीकडं त्याचे संदर्भही वेगवेगळेच........त्याचं स्वागतही वेगवेगळ्या पद्धतीने....रानात झाडाझाडांच्या पायात जणू पैंजण बांधून त्यांना तो आपल्या तालावर नाचवत असतो...सोबतीला वा-याची वेणू...मेघमल्हाराची तान....पण तोच शहरात कोसळताना मात्र बापुडवाणाच होतो...इथं त्याच्या तालावर बेभान होऊन तसं कोणी नाचत नाही...मग तो वेगळ्या पद्धतीने नाचवतो...लोकल्स बंद पाडून...नाल्यांमध्ये पूर आणून...लोकांच्या तोंडाला फेस आणण्याचे काम करतो...शेतावर बरसताना कर्तव्याचे भान ठेवण्याचा प्रयत्न तो आपल्यापरीने करतो...डोंगरांवरून धबाधबा कोसळतो आणि तरूणाईचं भान हरपवतो.....संथ, सूस्त झालेल्या नद्यांना पळवण्याचं काम करतो....ठराविक मोजूनमापून उसळणा-या सागरातील लाटांना जरा चेतवतो......
आज मला आठवतोय तो लहानपणीचा माझ्या गावाकडचा पाऊस....साई..माझं जन्मगाव...कोकणातलं ते खेडं...पावसाळ्यात पाऊस भरपूर..जून महिन्यात एकदा पाऊस बसला की चार महिने निघायचं नांव घेत नसे. नंतर आता जातो मग जातो करत करत दसरा-नवरात्र करूनच जायचा तो...तालुक्याला जोडणारा रस्ता कच्चा...एक पाऊस पडला की एस.टी.बंद..लोकांचं उठसूट तालूक्याच्या गावी जाणं बंद व्हायचं म्हणून मग घरात लागणारं सामान आगोठीच्या आतच भरलं जाई....गावात सातवीपर्यंतची चार खोल्यांची शाळा...जमीन शेणाने सारवणीची तिला ओल येई...मग चार महिने रोज घरून बसण्यासाठी गोणपाट घेऊन जावं लागे....
शाळेच्या खिडकीतून लांबचलांब, पाsर त्या टोकापर्यंत, डोंगराच्या कडापर्यंत पसरलेली शेती दिसत असे. हिरव्यागार शेतांचे लहानमोठे चौकोन..त्यावरील बांधांच्या लालसर रेघा !..अधूनमधून झाडं...झाडांनी गच्च भरलेले डोंगर..आणि या सर्वांवरून भरपूर कोसळत असलेला धुवाँधार पाऊस ! त्या धुवाँधार पावसाच्या वर्षावात जोराचं वारं वाहायला लागलं की सगळ्या वातावरणाला एक वेगळाच निळसर रंग येई..त्या रंगात डोंगर, झाडं सर्व धूसर धूसर दिसत. ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर अजून जसंच्या तसं येतंय....
बाहेर रपारपा पडणारा पाऊस आणि घरात पाटावर वालाचं बिरडं सोलत बसलेली माझी आजी हे पावसाळ्यातलं आमच्या घरातलं नेहमीचं दृश्य. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत तेव्हा..मग वाल, बेगमी करून ठेवलेले भोपळे, सूरण, रताळ्यांचे कंद यांवरच चार महिने भागवायला लागायचं...पावसाळ्यात मिळणारी एकच भाजी ती म्हणजे कंटोली....ती सर्वांना प्रिय...
आवटातील बहुसंख्या लाकडं ओलसर होत मग पाणी तापवण्यासाठी चूल पेटवताना फार त्रास होई. फुंकणीने फुंकून फुंकून तोंड दुखून जाई अगदी.....
डोक्यावर इरलं किंवा घोंगडं घेऊन शेतकरी, कुणबी ढोपरभर चिखलातून कामं करताना सर्वत्र दिसत..दिवसभर चिखलातून काम केल्यानं त्यांच्या पायाला चिखल्या होत..मग संध्याकाळी घरी आल्यावर शेकोटी पेटवायची त्यात मेंदीचा पाला टाकायचा आणि  त्याच्या धूरावर पाय धऱून बसायचं...शेकोटीच्या वरती भिंतीवर ओलं घोंगडं सुकण्याकरिता पसरून टांगलेलं असे.
श्रावणाचे दिवस आले की पाऊस जरा विश्रांती घेई...बालकवींच्या कवितेतील वातावरण सर्वत्र चित्ररूप होऊन येई. दोन महिने घराबाहेर विशेष पडायला न मिळालेल्या बायका मग श्रावणी सोमवारी शंकराला जायच्या निमित्ताने निघत...शंकराचं मंदिर पार कोंडाच्याही वरती...शेतांच्या बांधा बांधावरून जावं लागे....मध्ये छोटासा ओहळ लागे...त्या पाण्यातून पुढं गेलं की एक अगदी एवढीशी टेकडी होती त्यावर शंकराचं मंदीर आणि मंदिरालगत स्मशान..! आजूबाजूच्या हिरव्यागार पट्ट्याने आनंदीत आणि उल्हसित झालेलं मन टेकडी चढताच धसकायचं. सगळी भीती एकदम दाटून यायची. स्मशानातच ते मंदीर होतं.

मंदीरातून आल्यावर मग दोन रात्री झोप लवकर लागायची नाही. भीती वाटत राहायची. त्यात परसातल्या केळींच्या पानावर पडणारे पावसाचे टपटप पाणी. रातकीड्यांचा कीर्र आवाज आणि बेडकांचे डराँव डराँव अव्याहत चालू असे.- हे सर्व आवाज भीतीत भर घालत.
मग येई दहीहंडी . गोपाळकालो खेळणारा गोविंदा मग घराघरातल्या गृहीणींना तुझ्या घरात नाही गं पाणी म्हणून चिडवत येई...त्यांच्या अंगावर बादल्या भरभरून दहीताकमिश्रीत पाणी ओतावं लागे....यानंतर सुरू होत गणपतीच्या स्वागताकरिता नाच..गावातील मारूतीमंदीरासमोर हे नाच होत...पावसामुळे चिखल झालेल्या जमिनीवर नाचणा-यांकरिता भाताचा कोंडा पसरून घातला जाई...घराघरांच्या पाय-यांवर, ओटीवर बसून लोक तासनतास नाच पाहात बसत....गणपतींना निरोप देण्यासाठी मात्र पाऊस हमखास हजेरी लावीच. गावाबाहेरच्या नदीत होणा-या विसर्जनाला हिरवं-ओलं, मऊ गवत तुडवत गेलो नाही, असं कधी झालं नाही.
आताही 'नेमेचि येतो मग पावसाळा' प्रमाणे पाऊस येतोच. पण आता 'तो' पाऊस नाही. इथं शहरात त्याची रुपं बदललीयत. माझ्यासाठी तरी. धुवाँधार पावसात हिरवीगार शेतं नाहीत बघण्यासाठी तर खिडकीतून दिसते ती समोरची पिवळी आणि शेवाळलेली इमारत..!
-अलका.
Alka Aserkaraserkaralka@yahoo.com

1 टिप्पणी: