बुधवार, १० ऑगस्ट, २०११

(न्टेट्युप्पाक्कोरानेन्टारन्नु)........माझ्या आजोबांचा एक हत्ती होता



 
  तवैभवाच्या खुणा उराशी बाळगून वर्तमानात जगणाऱ्यांना या देशात कधीच तोटा नव्हता. न्टेट्युप्पाक्कोरानेन्टारन्नु (माझ्या आजोबांचा एक हत्ती होता) अशा शीर्षकाची वैकोम मुहम्मद बशीर यांची मल्याळम भाषेतील कादंबरी, केरळमधील मुस्लिम समाजातील परंपराप्रियतेचे चित्रण करणारी आहे. वर्तमानाशी, वास्तवाशी नाते न जोडता, त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच वल्गना करत राहणाऱ्या एका कुटुंबाची ही कथा एकूणच मुस्लिम समाजाच्या अवस्थेकडे बोट दाखवणारी आहे. बशीर हे मल्याळीतील फार मोठे लेखक. त्यांची साधी शैली आणि वास्तवाला भिडणारे विषय हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ठरले.
    या कादंबरीतली कुंजुपुट्टम्मा ही एकेकाळी दारी हत्ती झुलत असलेल्या आजोबांची नात आहे. तिच्या आईला आपल्या श्रीमंत वडिलांचा असणारा अभिमान हा कुंजुपुट्टम्मावरचा प्रभावी संस्कार आहे. गतवैभवाच्या कहाण्यांचे डोस पिऊन वाढलेली ही मुलगी, आपण कोणीतरी आहोत याच जाणिवेत राहत आली आहे. तिच्या बालपणीचे बरे दिवस मात्र लवकरच पालटतात आणि हे कुटुंब भल्यामोठ्या वाड्यातून एका पडक्या घरात राहायला जाते. कसेबसे दिवस सरत असताना त्यांच्याशेजारी दुसरे मुस्लिम कुटुंब राहायला येते. त्या घरातल्या साध्या साड्या नेसणाऱ्या बायका आणि साधेपणाने राहणारे पुरुष कुंजुपुट्टम्माला आणि तिच्या आई-वडिलांना वेगळी दिशा दाखवणारे ठरतात, त्याची ही गोष्ट आहे.
   शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छतेची गरज आणि कालबाह्य जीवनपद्धतींना फाटा देण्याची निकड अशा गोष्टी नव्यानेच या मुलीला समजतात. तिची आईही कधीतरी परंपरेच्या ज्वरातून बाहेर येते. भूतकाळाचे ओझे डोक्यावर वागवणाऱ्या एका कुटुंबाचा तिमिरातून प्रकाशाकडे होणारा प्रवास या कादंबरीतून बशीर यांनी साकारला आहे. जोडीला गावाकडच्या निर्मळ जीवनाचे, वातावरणाचे चित्रण आहे. मुस्लिम मानसिकतेच्या दोषांवर बोट ठेवताना आणि त्यासाठी नर्म विनोदाचा आश्रय घेतानाही हा उपहास बोचरा वा विध्वंसक होऊ दिलेला नाही. त्यात कुचेष्टा आणलेली नाही. आपल्या समाजाची नस ओळखणाऱ्या बशीर यांनी त्याच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन वेळोवेळी केले. प्रस्तुत कादंबरी याच वाटेने जाणारी आहे.
   नव्या विचारांकडे ओढले जाणआरे कुंजुपुट्टम्माचे कुटुंब हा अनुभव घेताना ज्या मनोवस्थेतून जातो त्याचे चित्रण हा या कादंबरीचा गाभा आहे. जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होण्यासाठी नेमकी कशची गरज आहे, याचे या कुटुंबाला आलेले भान बशीर यांनी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत चित्रित केले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या लेखनात या पुस्तकाची गणना केली जाते.
image.png
Nandini Atmasiddha



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा