बुधवार, १० ऑगस्ट, २०११

’ह्यो,ह्यो ह्यो(प्रमुख)पाहुणा’

Pramod Bejkar


इये मराठीचिये नगरी,सांस्कृतिक क्षेत्रात सगळी आबादीआबाद आहे.कुत्र्याच्या छत्र्या फ़क्त पावसाळ्यात उगवतात,पण आपल्याकडे नवीन,नवीन सांस्कृतिक संस्था दर दोन चार महिन्याने उगवतच असतात.आपण काही हालचाल केली नाही तर संस्कृतीचं काही बरं वाईट होईल की काय ही भीतीच अनेकजणांना हा द्राविडी प्राणायाम करायला उद्युक्त करत असावी.एखाद्या गावात अशी सांस्कृतिक कळवळा असलेले इनेगिने लोकच असतात.त्यामुळे गावातल्या संस्था वाढल्या की,एखाद्या कमी बजेटवाल्या नाटकात जसं एकाच नटाने तीन चार भुमिका कराव्यात तशा खजिनदार,सेक्रेटरी,अध्यक्ष,कार्यकर्ता,अशा विविध भुमिका तीच तीच माणसं वेगवेगळ्या संस्थातून करून एक प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमच सादर करत असतात.
  संस्थेचा श्रीगणेशा करणं तसं सोपं,म्हणजे चार जणांना एकाच वेळी सणक आली तर कुठलीही संस्था जन्म घेऊ शकते.पण नंतर तिचा प्रतिपाळ करणं हे महा कर्मकठीण काम असतं.कारण संस्थेत सर्वजणच पदाधिकारी व्हायला धडपडत असतात,आणि कार्यकर्ते मिळवणं हे कार्यक्रमाला रसिक मिळवण्याइतकंच अवघड असतं.
    असं काहीही असलं तरी आपली सांस्कृतिक महत्ता टिकवण्यासाठी,संस्था जिवंत राहणं जरूरीचं असतं.एखाद्या बेशुद्धप्राय माणसानं मधेच हातपाय हालवून आपल्या जिवंतपणाची ग्वाही द्यावी,तशी काहीतरी कार्यक्रम सादर करून आपल्या जिवंतपणाची खूण दाखवणं संस्थांना आवश्यक असतं.खरं म्हंटलं तर घरच्या घरी मनोरंजनाच्या सागरात गटांगळ्या खाणा-या समस्त रसिकजनांना,काही हौशी बेट्यांनी वसवलेल्या या बेटावर येण्यात काहीही स्वारस्य नसतं.तिकीट नसतं तरीही रसिकांचा एवढा दुष्काळ असतो,की जाहिरात करून ’कृपया फ़्री पासेस मागा"अशी गळ घालायची काहीजणांवर पाळी येते.
 पण लोकांचं मनोरंजन वा प्रबोधन करायची देवदत्त जबाबदारी आपल्या शिरावर असल्याची खात्री असलेले लोक तरीही एखादा कार्यक्रम ठरवतातच.जसं लग्न म्हंटलं की नवरा नवरी ही अत्यावश्यक बाब ठरते,त्याचप्रमाणे कार्यक्रम म्हंटला की प्रमुख पाहुणा लागतोच.बरं कार्यकर्त्यांपासून पैशापर्यंत सर्वच बाबतीत तुटपुंज्या असलेल्या संस्थेला प्रसिद्धीने तेज:पुंज पाहूणा परवडत नाही.कारण त्याच्या काही अपेक्षा असतात,आर्थिक गणितं असतात.गणित हे डोकेदुख्हीचं आणि अपेक्षा हे दु:खाचं मूळ असल्यामुळे बहुतेक सेलिब्रिटी हे बीटी वांग्याप्रमाणे त्याज्य ठरतात.
 पण प्रमुख पाहुणेपदाची हौस असलेले अनेक सोमेगोमे असतात.त्यामुळे प्र.पा.चा टिळा कार्यक्रमाच्या कपाळावर लागतोच.पैशाने सर्व मिळतं असं मानणारे महाभाग तर संस्थेला देणगी वगैरे देऊन हा ओसाड गावच्या राजाचा मुकुट एक दिवसा साठी खरीदतात.असाच एक नवश्रीमंत प्र.पा.एका शाळेच्या गॅदरींगला इतक्या लवकर गेला,की हॉलच्या नोकराला तो शाळेतला शिक्षकच वाटला,आणि मग तो त्याला ’पोरांना जरा शिस्तीत बसवा.वगैरे सांगायला लागल्यावर प्र.पा.बिचारा अगदी बापुडवाणा झाला.
  या मारुन मुटकून पाहुण्यांची ओळख करून देण्याजोगं काहीच नसल्याने बहुदा,’यांना कोण ओळखत नाही’ असा उत्तराची अपेक्षा नसलेला प्रश्न विचारून ओळखकर्ता आपली सुटका करुन घेतो.प्र.पा.म्हणून उपलब्ध न झालेल्या मान्यवरांची यादीच सादर करून काही सत्यवचनी,या महाभागावाचून कुठलाच पर्याय नव्हता हे आधीच सांगून,तो नंतर करू शकणा-या गोंधळाची जबाबदारी झटकून टाकतात.(हुश्श,एवढं मोठं वाक्य लिहिलं की दमायला होतं)प्र.पा.चं नावच विसरणं,स्टेजवरूनच,’तुमचं नाव काय हॊ?’असं विचारून पुन्हा’श्रीमान अमुक तमुक यांना सारं जग ओळखतं’असं म्हणून’जगन्मिथ्या’ची आठवण करून देणं असे बरेच मनोरंजक कार्यक्रम या ओळखपरेडमध्ये होतात.
    या प्र.पा.चं भाषण म्हणजे एक भीषण अनुभव असतो.आपल्या द्न्यानामृतात भिजण्यासाठी सारे उत्सुक आहेत,या समजूतीत हे महाशय,इतके बरसायला लागतात,की’पाहुणा नको पण भाषण आवर’असं म्हणायची पाळी येते.यातील बहुतेकांना भिजवता नसलं तरी निजवता मात्र येतं.या भाषणात,अं..अं..उं..उं अशी बाराखडी,मोठ्या वाक्याच्या सोसात,शब्दांची नको तिथे मोडतोड,संस्थेची चुकीची माहिती,अशा अनेक मनोरंजक गोष्टी असतात.श्रोत्यांना आपल्याला मिळणा-या बक्षिसात,किंवा सादर करायच्या कार्यक्रमात स्वारस्य असल्यामुळे,ही भाषणं कोणी ऐकत नाही,ही गोष्ट या धुंदीत असलेल्या,प्र.पा.च्या कधीच लक्षात येत नाही.
        तर या,प्रमुख पाहुण्यांबद्दल मी इतकं च-हाट का लावलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.त्याचं काय आहे,हल्ली सर्वच गोष्टींचे क्लासेस निघालेत,म्हणजे लहान मुलांशी ’अरे सोनुल्या’वगैरे लाडंलाडं बोबडं कसं बोलावं यापासून बायकोला कायकाय थापा माराव्यात इतपर्यंत.तर नववधूसारखे अडखळत आणि लाजत लाजत बोलणा-या या नव प्र.पा.साठी मी क्लासेस सुरू केलेत.त्यात खाली न पाडता बक्षिसं देणं,प्रसंग कठलाही असला तरी तेच भाषण इकडेतिकडे फ़ेरफ़ार करून म्हंटणं,आपणच एकमेव शहाणे असल्याच्या आविर्भावात सगळ्यां समोर वावरणं,वगैरे गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.तर सर्व होतकरू आणि भावी प्रमुख पाहुण्यांनो,वेळ न दवडता आमचा क्लास लावा,तुमचं स्वागत आहे.
                                                                                                                                          
 डॉ.प्रमोद बेजकर.

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा